देशाला भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे काम पंतप्रधान यांनी केले- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर-75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाने चौफेर प्रगती केलेली आहे. सरंक्षण, शिक्षण, अर्थकारण यांसह देशाला जागतिक पातळीवर स्थान मिळवून देण्यासाठी व राष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांनी निष्ठेने कार्य केले आहे. देशातील शेतकरी आणि कृषी क्षेत्र समृध्द आणि संपन्न व्हावे, यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील आहे. हे देशाचे पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्या कार्यपध्दतीवरून दिसून येत आहे. युनोमध्ये पहिल्यांदा सुरक्षा दक्षता समितीचे अध्यक्षपद 70 वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आलेले आहे. त्यामुळे जगातील 13 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतिउच्च सन्मान देऊन गौरविले आहे. यामध्ये तीन मुस्लीम राष्ट्रांचा समावेश आहे. खर्या अर्थाने देशाला भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक काम करणारे सरकार देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. असे प्रतिपादन भाजपा नेते तथा जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय,मजगे नगर येथील विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जेएसपीएम संस्थेचे संचालक दिलीप पाटील, प्राचार्य आप्पासाहेब पाटील, मुख्याध्यापिका सुनिता मुचाटे, उपप्राचार्य चेवले, भूजंग पाटील, उपमुख्याध्यापक अनिल सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर की, 75 वा स्वातंत्र्यदिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हर घर तिरंगा या उपक्रमातून देशप्रेम जागृत करण्याचे काम केले जात आहे. तिरंगा हे त्याग, समर्पण, अखंडता व भक्ती-शक्तीचे प्रतिक आहे. 1947 मध्ये इंग्रजांच्या विरोधात टिपू सुलतान, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी लढा देऊन स्वातंत्र्य मिळविण्याचे काम यांनी व देशातील महात्म्यांनी केले. देशामध्ये 35 ते 37 वर्षानंतर सीबीसीएस शिक्षणपध्दती आणण्याचे काम केंद्र शासनाने केले. तसेच सर्व क्षेत्रात चौफेर प्रगती साधण्याचे कामही केलेले आहे. त्यामुळे 18 व्या शतकात स्वामी विवेकानंदांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरेल आणि 21 व्या शतकामध्ये भारत जगाचे नेतृत्व करेल. आपण आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये आईवडिलांपेक्षा जास्त सन्मान गुरूजनांचा करतो, साधुसंताचे अस्त्तित्त्व मान्य करतो. त्यामुळे स्वतःचे विचार व आदर्श जपण्याचे काम विद्यार्थ्यांनी करावे. डॉक्टर, इंजिनियर होण्यासाठी एक आदर्श श्रावण बाळ निर्माण करण्याचे काम करावे. तसेच सत्यवादी, सदाचारी विचारावरती चालणारा माणूस निर्माण करण्याचे काम करावे. गुजरात सरकारप्रमाणे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातून कुराण, बायबल व भगवत्गितेची शिकवण द्यावी असे मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व ध्वजारोहन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच एम.टी.एस. स्पर्धा परीक्षा, रांगोळी, चित्रकला स्पर्धा आदी स्पर्धेतील विजेत्यांना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुनिता मुचाटे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अब्दूल गालीब शेख यांनी मानले. यावेळी महाराष्ट्र विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आवडीच्या क्षेत्रात आदर्श निर्माण करण्याचे करावे
शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना आदर्श स्वरूपाचे काम करावे. आपल्या स्वामी विवेकांनद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सच्चिदानंद जोशी यांना शंकरराव चव्हाण यांच्या नावाने शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार मिळाला. तसेच शिवाजी महाविद्यालय रेणापूर या महाविद्यालयास उत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार व प्राचार्य आर.एस.अवस्थी सर यांना उत्कृष्ठ प्राचार्य पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यामुळे प्रत्येकांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात आदर्श स्वरूपाचे काम करून आदर्श निर्माण करण्याचे काम करावे, असे आवाहनही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
إرسال تعليق