वर्षभर कुंभकर्णा प्रमाणे झोपलेल्या प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना केवळ गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई गोवा महामार्गाच्या थातूरमातूर मलमपट्टी साठी जाग येते....!

 वर्षभर कुंभकर्णा प्रमाणे झोपलेल्या प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना केवळ गणेशोत्सवाच्या तोंडावर

 मुंबई गोवा महामार्गाच्या थातूरमातूर मलमपट्टी साठी जाग येते....! 



       बोरघर /माणगाव ( विश्वास गायकवाड ) देशातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांपैकी एक समजला जाणाऱ्या   मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अर्थात ( पुर्वीचा क्रमांक एनएच १७ ) आणि आताचा एनएच ६६ या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे देशाच्या भौगोलिक सामाजिक,सांस्कृतिक शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, प्रांतिक आणि एकंदरीत सर्वच प्रकारच्या प्रगती मध्ये विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान होते, आहे आणि राहिल या बाबत यत्किंचितही शंका नाही. 
       मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा देशाच्या उत्तर मध्य आणि दक्षिण ध्रुवाला म्हणजे मुंबई ते दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी शहराला जोडणारा सुमारे १६४० किलोमीटर लांबीचा व्यापारी दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा  राष्ट्रीय महामार्ग आहे. सदर राष्ट्रीय महामार्ग हा देशाच्या पश्चिम सागरी किनारपट्टी वरील ऐतिहासिक पर्यटन स्थळांना , शहरांना जोडणारा सर्वप्रिय राष्ट्रीय महामार्ग असून कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबईस्थीत चाकरमन्यांच्या परिवहनाचा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. या राष्ट्रीय महामार्गावरून रात्रंदिवस निरंतर असंख्य लहान मोठ्या खाजगी, सरकारी, मालवाहू वाहनांची आणि एसटी महामंडळाच्या एसटी बसेस च्या वाहतूकीची निरंतर येजा सुरू असते.
       मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या लांबपल्ल्याची व्याप्ती वाढवल्या नंतर हा पूर्वाश्रमीचा एनएच १७ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आता एनएच ६६ क्रमांकाने ओळखला जातो. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम निष्क्रिय प्रशासन लोकप्रतिनिधी आणि मुजोर कंत्राटदारांमुळे तब्बल दहा बारा वर्षे रखडले आहे. सदर महामार्ग चौपदरीकरणाच्या परिपूर्णतेच्या निर्धारित तारखा वर्षा वर्षाने पुढे पुढे सरकत आहेत. 
      चौपदरीकरणाच्या मोह मृगजळी विळख्यात रखडलेल्या या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. या महामार्गावर सर्वत्र ठिक ठिकाणी जीवघेण्या मोठ मोठ्या खड्ड्यांचे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या तथाकथित महामार्गावरून वाहने चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. तर प्रवाशांना आपला अनमोल जीव मुठीत घेऊन अनेक संकटांचा सामना करत प्रवास करावा लागत आहे. या महामार्गावरील मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन अपघात होऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. सदर महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे अनेकांची कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. संपूर्ण देश भरातील निसर्ग प्रेमी, पर्यटक, कोकणातील चाकरमानी प्रत्येक वीकेंडला, सणावाराच्या सुट्टीत अर्थात दिवाळी, शिमगा, लग्न सराईत, गणेशोत्सव , नवरात्रीला आपापल्या गावी येतात, तसेच असंख्य पर्यटन व निसर्ग प्रेमी कोकणातील निसर्ग सौंदर्य, सुंदर समुद्र किनारा, लेणी, गड, किल्ले आणि पर्यटन स्थळे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने याच राष्ट्रीय महामार्गाचा वापर करून येत असतात. 
     कोकणातील सर्वात मोठा सण अर्थात गणेशोत्सव या गणेशोत्सवाच्या तोंडावर या राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्याने तमाम कोकणातील स्थानिक मराठी माणूस आणि चाकरमानी यांच्यात शासनाच्या या नाकर्तेपणामुळे संताप निर्माण झाला आहे. याचे पडसाद अधिवेशनात उमटले आणि वर्षभर कुंभकर्णा प्रमाणे झोपलेले शासन प्रशासन, कोकणातील लोकप्रतिनिधी, लोकसेवक,आमदार, खासदार आणि मंत्रीमंडळ दरवर्षी प्रमाणें खडबडून जागे झाले. आणि त्यांनी गणेशोत्सव सण तोंडावर आलेला असताना या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या थातूरमातूर मलमपट्टीचे काम हाती घेतले आहे. या थातूरमातूर मलमपट्टी च्या माध्यमातून दरवर्षी शासनाच्या अर्थात जनतेच्या करोडो रुपयांचा निरर्थक चुराडा होऊन ते पाण्यात जातात आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी शासनाची नौटंकी सुरू असते. हे आता थांबवलेच पाहिजे. कारण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा केवळ आपल्या कोकणाचीच नाही तर संपूर्ण राष्ट्राची अस्मिता आणि शान आहे. त्यामुळे आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जनतेचा प्रवास कायम सुखकर कसा होईल याची  निस्वार्थ, निर्हेतूक पणे प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या करीता शासन प्रशासन, संबंधित ठेकेदार, कंत्राटदार व संबंध कोकणातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि मंत्री यांनी कंबर कसून प्रयत्न केले पाहिजे.

Post a Comment

أحدث أقدم