सार्वजनिक गणेश मंडळांना यावर्षीपासून शासनाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी


 सार्वजनिक गणेश मंडळांना यावर्षीपासून शासनाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी


           लातूर-महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि. 26 ऑगस्ट, 2022 अन्वये दि. 31 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत.

            या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. पूढील निकषाच्या आधारे पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल. गुणांकनासाठी बाबी व गुणांक पूढील  प्रमाणे आहे.

            पर्यावरणपुरक मुर्ती - गुणांक 10, पर्यावरणपुरक सजावट (थर्माकोल, प्लॅस्टीक ईत्यादी साहित्य विरहीत)- गुणांक 15, ध्वनीप्रदुषण रहित वातावरण - गुणांक 5, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रध्दा निर्मूलन, सामाजिक सलोखा, इ. समाज प्रबोधन विषयावर देखावा, सजावट- गुणांक 20, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भातील देखावा, सजावट - गुणांक 25, रक्तदान शिबीर, वैद्यकीय सेवा शिबीर इत्यादी कार्य (अन.क्र. 7 व 8 व्यतिकरक्त)- गुणांक 10, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थींनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादीबाबत केलेले कार्य- गुणांक 10, महिला ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादीबाबत केलेले कार्य- गुणांक 10, पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा- गुणांक 10, पारंपारिक, देशी खेळाच्या स्पर्धा- गुणांक 10 व गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा (पाणी, प्रसानधगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे नियोजन,आयोजनातील शिस्त इ. प्रत्येक सुविधेस 5 गुण)- गुणांक 25 एकूण 150 गुणांक असणार आहेत.

           वरील बाबींची पुर्तता करणाऱ्या, करु शकणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी करावयाचा अर्जाचा नमुना राज्य शासनाचे संकेतस्थळ www.maharashtra.gov.in पु.ल. देशपांडे कला अकादमी यांचे संकेतस्थळ www.pldeshpandekalaacademy.org व दर्शनिका विभागाचे संकेतस्थळ https://mahagazetteers.com   वरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालय, पोलीस ठाणे येथे उपलबध असेल. सदर अर्ज व सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

           सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने सदर अर्ज भरुन mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर दि. 2 सप्टेंबर, 2022 पूर्वी ऑनलाईन पाठवावेत.  राज्यातील पहिल्या तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळाचा शासनाकडून पुढीलप्रमाणे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल. प्रथम क्रमांक रुपये 5 लाख, व्दितीय क्रमांक रुपये 2 लाख 50 हजार व तृतीय क्रमांक रुपये 1 लाख असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

            तसेच राज्य समितीकडे 36 जिल्ह्यातील 1 याप्रमाणे 36 प्राप्त शिफारसीत गणेशोत्सव मंडळापैकी  3 विजेते गणेशोत्सव मंडळ वगळून उर्वरित 33 गणेशोत्सव मंडळांचाही राज्य शासनाकडून रुपये 25 हजार पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल.

          लातूर जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

 

Post a Comment

أحدث أقدم