विरोधकांकडून सातत्याने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न- माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर

 विरोधकांकडून सातत्याने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न- माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर






लातूर/प्रतिनिधी- जिल्ह्यात अतिवृष्टी, गोगलगाय व सततचा पाऊस यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई शासनाकडून प्राप्त होत असून दोन टप्यात आतापर्यंत नुकसान भरपाई आली असून लवकरच मदतीचा तिसराही टप्पा येणार आहे. मात्र केवळ विरोधासाठी विरोधाचे राजकारण करून शेतकर्‍यांमध्ये सातत्याने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार संवेदनशिल असून शेतकरी हिताचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना ही ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार निश्चितच संवेदनशिलपणे काम करीत असल्याचे विरोधकांनाही मान्य आहे. मात्र वैयक्तीक विरोधासाठी विरोधाचे राजकारण करत या मंडळींकडून आंदोलनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ लागला असल्याचे आ. निलंगेकरांनी स्पष्ट केले. वास्तविक सर्वात प्रथम म्हणजे दि. 12 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जिल्ह्यात अतिवृष्टी आणि गोगलगायमुळे शेतीपिकाचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आणून देत याबाबत शेतकर्‍यांना मदत करण्यात यावी अशी मागणी केलेली होती. त्याचबरोबर याप्रश्नी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा केलेला होता. जिल्ह्यातील भाजपाच्या इतर आमदारांनी सुद्धा याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन शेतकर्‍यांना मदत प्राप्त व्हावी अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे याबाबत पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात आली होती. सर्वांनी एकत्रीत पाठपुरावा केल्यामुळेच शेतकर्‍यांना सरकारच्या माध्यमातून मदत जाहीर करण्यात आली आहे. वास्तविक आता अतिवृष्टी आणि गोगलगाय यामुळे झालेल्या नुकसानीपोटी मदत जाहीर झाली आहे. ही मदत दोन टप्यात आली असून लवकरच सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची मदत ही जाहीर होणार असून ती शेतकर्‍यांना मिळणार आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचेही माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी सांगितले आहे.
शेतकरी हिताला प्राधान्य देणार्‍या सरकारकडून मदत देऊ केलेली असली तरी केवळ वैयक्तीक विरोधासाठी विरोधकांकडून आंदोलनाचे राजकारण करण्यात येऊ लागलेले आहे. मात्र याच विरोधकांच्या सत्ताकाळात शेतकर्‍यांना मदत मिळण्यासाठी या आमदारांनी किंवा आंदोलन करणार्‍यांनी सरकारकडे मागणीही केली नसल्याचे निदर्शनास आणून देत याबाबत पाठपुरावाही केला नसल्याचे आ. निलंगेकरांनी सांगितले. सध्याच्या नुकसानीसाठी शेतकर्‍यांना मदत मिळावी याकरीता आपण स्वतःहून विरोधी आमदारांशी संवाद साधत सर्वानी एकत्रीत येऊन सरकारकडे मागणी करू, असेही सांगितले. मात्र हे आमदार सोबत आले नसल्याचेही सांगितले. त्यामुळे आता आंदोलन करुन शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होऊ लागलेला आहे.  या संभ्रमाला निश्चितच शेतकरी बळी पडणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करत माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्य पाठिशी सरकार खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर लम्पी रोगापासून पशुधनांचा बचाव व्हावा याकरीता जिल्ह्यातील सर्व पशुधनांचे लसीकरण 30 सप्टेंबर पर्यंत पुर्ण करण्याचे सुचना प्रशासनाला दिले असल्याचे माहिती यावेळी माजी मंत्री आ. निलंगेकरांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم