हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परांजपे फाऊंडेशनच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन : गोमारे

 हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 

परांजपे फाऊंडेशनच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन : गोमारे 



लातूर : हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लातूरच्या बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनच्या  वतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभर चालणाऱ्या या अमृत महोत्सवी वर्षाचा उद्घाटन सोहळा येत्या शुक्रवारी, दि. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार असल्याची माहिती  हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ मनोहरराव गोमारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. 
             हा उद्घाटन सोहळा दयानंद सभागृहात माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते  होणार आहे.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालालजी सुराणा हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ लेखक निळू दामले यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण  लाहोटी, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  याच कार्यक्रमात भाऊसाहेब उमाटे लिखित शौर्यगाथा : हैदराबाद मुक्तिसंग्रामाची या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. 
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना मनोहरराव गोमारे म्हणाले की, हैदराबाद मुक्ती संग्रामाचा दुर्लक्षित इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचवावा तसेच या मुक्तिसंग्रामात योगदान दिलेल्या ज्ञात - अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचे स्मरण करावे  या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील जीवनधर शहरकर गुरुजी व मुर्गाप्पा खुमसे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर शहरात नवीन शासनामार्फत नवीन सभागृह निर्माण करण्याची मागणी लावून धरली जाणार आहे. तसेच वर्षभरात मराठवाड्यातील विविध शाळा , महाविद्यालयांमध्ये सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ७५ व्याख्यानांचे आयोजनही केले जाणार आहे. मराठवाडा स्तरावर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, गीत गायन स्पर्धाआयोजित केली जाणार आहे. याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे  आयोजन केले जाणार असल्याचे गोमारे यांनी सांगितले. 
यावेळी संयोजन समितीचे कार्याध्यक्ष सूर्यकांत वैद्य, उपाध्यक्ष विधिज्ञ उदय गवारे यांनीही आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. बी.आर. पाटील, माणिकराव कोकणे, रमेश चिल्ले, प्रा. दत्ता सोमवंशी, राजाराम बिलोलीकर यांची उपस्थिती होती. 

Post a Comment

أحدث أقدم