आपण आपल्या आयुष्याला भिडायचे...!

आपण आपल्या आयुष्याला भिडायचे...!

आपले भविष्य आपण आपल्या कर्माने घडवायचे. आपल्यावर आलेली आव्हाने स्वीकारायची. संकटांना कधी घाबरायचे नाही. आयुष्याला भिडायचे. जो कोणी संकटांना सामोरा येईल, त्याच्या नजरेला नजर रोखून सामना करायचा. भविष्याचा विचार करायचा नाही. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या "कर हर मैदान फतेह" या पुस्तकातील या प्रेरणादायी ओळी आयुष्याला भिडायचे कसे? आपोआप शिकवून जातात. ते स्वतः संघर्षातून वर आले तेव्हा परिस्थितीची झळ सोसणे काय असते, हे त्यांना चांगलेच समजते. आपल्याही आयुष्यात संघर्षाचे क्षण, दिवस, महिने, वर्ष येतात. तेव्हा आपण संघर्षाला नेमके कसे सामोरे जातो हे महत्त्वाचे. काही रडत कढत सामोरे जातात. तर काही स्थिरतेने.तर काही सहनशीलतेने, संयमाने सामोरे जातात.
रडत रडत जगणाऱ्यांच्या वाट्याला येते निरसता आणि स्थिरतेने जगणाऱ्यांच्या वाट्याला येते शांतता. ते विद्यार्थ्यांना म्हणतात, की तुमच्यातील बलस्थाने ओळखा. तुमच्यातील क्षमतांचा अभ्यास करा आणि मग त्याला योग्य असे स्पर्धेचे मैदान निवडा. म्हणजेच काय तर आपल्याकडे नेमके कोणते कौशल्य आहे, ते ओळखून त्यावर फोकस केला तर आयुष्याविषयी फार तक्रारी राहत नाहीत. शिक्षण व्यवस्थेतही आता कौशल्य शिक्षण येण्याच्या मार्गावर आहे व काही कमी जास्त प्रमाणात आला सुध्दा आहे आणि या पद्धतीने जर शिक्षण सुरू झाले, तर असे शिक्षण युवक- युवतींसाठी मैलाचा दगड ठरणारे असेल. कारण सगळे विद्यार्थी एकाच मापातून तोलणे योग्य आहे का ? प्रत्येक मूल हे वेगळे असते. त्याचे ते वेगळेपण ओळखून त्याचा त्याप्रमाणे सराव करून घेणे, ही आपली मुख्य जबाबदारी आहे. एखाद्याला छान पोहता येतेय, तर त्याला मुलभुत शिक्षण देऊन पोहण्यात पुढे नेता येईल. गरजेपुरत्या मुलभूत शिक्षणानंतर कौशल्याधिष्ठित, व्यवसायाशी निगडित आज  शिक्षण काळाची मोठी गरज आहे. कित्येक तरुण-तरुणींकडे उत्तम शेती करण्याचे कौशल्य असते. पण घर आणि समाज त्यांना त्यापासून रोखतो. आणि नोकरी किती महत्त्वाची आहे, हे त्यांना विनाकारण पटवून देतो. जर त्यांना शेतीत आपलं भविष्य करावेसे वाटत असेल तर काय बिघडले. त्यांना संधी तर देऊन बघा. किती जोमाने आणि स्वतःमधील सर्व कौशल्ये पणाला लावून ही तरुणपिढी छान शेतीक्षेत्रात प्रगती करेल. 'मन में है विश्वास' मध्ये विश्वास नांगरे पाटील म्हणतात, की आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हे ही गरजेचे असतात. कारण यामुळेच पेटून उठतो आपल्यातला स्वाभिमान, जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो आपल्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस ! तुम्ही ज्या वेळी स्वतःशी मैत्री करता, स्वतःवर प्रेम करता, स्वतःला शांती आणि समाधानाशी जोडता, त्या वेळी मिळणारा आनंद भरभरून वाहायला लागतो.
अगदी आपलं आनंद व जीवन छान वाटायला लागतं.
@किशोर जाधव

Post a Comment

أحدث أقدم