लातूर जिल्ह्याच्या इतिहासाचा वारसा जतन करुया..!

जागतिक वारसा सप्ताहानिमित्त विशेष लेखमाला...!!

लातूर जिल्ह्याच्या इतिहासाचा वारसा जतन करुया..!











लातूर जिल्ह्याचा प्राचीन इतिहास खूप मोठा आहे. त्यावर अनेकांनी पुस्तकं लिहली आहेत. संशोधन पेपर प्रसिद्ध केले आहेत. वारसा लेखमालेतील पहिल्या भागात कोणी-कोणी यावर लिहलं आहे, याचा उल्लेख केला आहेच. या सर्वांच्या पुस्तकांचे, लेखांचे संशोधन संदर्भ पाहिले तर या विस्तृत इतिहासाची उकल होते. राज्याच्या दार्शनिका विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेले 'जिल्हा स्थलवर्णन कोश' तसेच प्रा. जायद्रथ जाधव यांनी संपादित केलेल्या 'लातूर वसा व वारसा' या हे ग्रंथ जिल्हा समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त  आहेत. ही लेखमाला लिहतानाही या ग्रंथांचा संदर्भ घेण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात जेवढे शिलालेख आणि ताम्रपट मिळाले ते आपण पाहिले.काही शिलालेख आणि ताम्रपटाचा उल्लेख मागच्या लेखात केला होता.

गरसोळी (ता. रेणापूर) येथील शिलालेखाचा काळ शक १०७१ किंवा १०७२ (इ.स. ११५०) असा आहे. याची भाषा मराठी आहे. महामंडलेश्वर उदयादित्याच्या महाप्रधानाने राजदित्य- देवाचे मंदिर बांधले. या देवाच्या अंगभोगासाठी काही भूमि दान केली, या संदर्भात हा लेख आहे. यात एकाही ग्रामनामाचा उल्लेख नाही.

कान्हेगाव (ता. शिरुर अनंतपाळ)  येथील शिलालेखाचा काळ शक ११८० (इ.स. १२५८) असा असून याविषयीचे लेखन  डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी केले. यादव राजा कान्हरदेवाचा मांडलिक गोपालदेवाने स्वकीयांसाठी व स्वजनांसाठी मोठा यज्ञ करून त्याची पूर्तता केली. यात लातूरसाठी 'लत्तनौर' असा संदर्भ आला आहे. इतरही काही ग्रामनामे आली आहेत.
 रेणापूर येथील महादेव मंदिरातील शिळेवर एक शिलालेख असून केवळ एका ओळीत याची नोंद आहे. याचा काळ शक १२२३ (इ.स. १३०१) असा आहे. इतर नोंदी काहीही नाहीत.











  चोबळी (ता. अहमदपूर) येथे एक ताम्रपट आढळला. त्याची भाषा मराठी असली तरी लिपी मोडी आहे. तो एकूण २६ ओळींचा आहे. या बाबतचे लेखन सु. ग. जोशी यांनी केले आहे. यात चोबळी हे ग्रामनाम 'चोखळी' असे आहे. अहमदपुरचा संदर्भ 'वरवाल राजूर' (वरवार म्हणजे आजचे वडवळ आहे आणि राजूर म्हणजे आजचे अहमदपूर आहे)  या ताम्रपटाचे महत्त्व मोलाचे आहे, कारण इ.स. १४५८ ला मोडी लिपी कागदावर लिहिली जात असे. पण ताम्रपटात तसे दिसून येत नाही. मोडी कोणी निर्माण केली. याचे निश्चित उत्तर प्राप्त होत नाही. हुमायून बादशहाने काढलेली ही सनद आहे.  या ताम्रपटात तीन चतुर्थाश शब्द परभाषीय आहेत. उपरोक्त बादशहाकालीन जमीन महसूल छटाक, नवटाक, पावशेर या मापाने नोंदला जात असे. हा जिल्ह्याचा पुरातत्वीय इतिहास अत्यंत मौल्यवान आहे. तो ठेवा सर्वांना कळावा व  हा वारसा जतन व्हावा,  हा या लेखमाले मागचा हेतू होता. 
                                                                                 - युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

Post a Comment

أحدث أقدم