भूजल संवर्धनासाठी जलसाक्षरतेवर भर द्यावा - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.



भूजल संवर्धनासाठी जलसाक्षरतेवर भर द्यावा - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.


लातूर : जलसंकट टाळण्यासाठी अटल भूजल योजना जिल्ह्यात प्रभावीपणे  राबवावी. यामाध्यमातून भूजल संवर्धनसाठी जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासह जलसाक्षरतेवर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा योजनेच्या जिल्हास्तरीय नियोजन व समन्वय समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित अटल भूजल योजनेच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा योजनेच्या जिल्हास्तरीय नियोजन व समन्वय समितीचे सहअध्यक्ष अभिनव गोयल, राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे जलसंधारण तज्ज्ञ रमेश पेटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  लक्ष्मण देशमुख, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यावेळी उपस्थित होते. यावेळी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच उपस्थितांना जल प्रतिज्ञा देण्यात आली.

लातूर जिल्ह्याने यापूर्वी भीषण जलसंकटाचा सामना केला असून पाण्याचे महत्व येथील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे. भविष्यात जलसंकट निर्माण होवू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात भूजल संवर्धन आणि जलस्त्रोतांच्या बळकटीकरणावर भर देण्याची गरज आहे. अटल भूजल योजनेसाठी जिल्ह्यातील अतिशोषित, शोषित आणि अंशतः शोषित अशा 135 गावांची निवड करण्यात आली आहे. केंद्र शासन व जागतिक बँकेच्या सहकार्य आणि लोकसहभागातून ही योजना राबविली जाणार असून यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी एकत्र येवून समन्वयाने काम करावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी सांगितले.

उपलब्ध पाण्याचा योग्य वापरासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. अटल भूजल योजनेचे भूजल मित्र आणि कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सिंचन पद्धतीविषयी मार्गदर्शन करावे. पर्जन्यमान कमी असलेल्या भागात कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. यासाठी अशा पिकांची प्रात्याक्षिके आयोजित करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. पुढील पिढीला शाश्वत भूजल देण्यासाठी अटल भूजल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज असून लोकांमध्ये याविषयी जाणीव जागृती करून लोकसहभागातून भूजल संवर्धनाचे उपक्रम हाती घ्यावेत, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यावेळी म्हणाले.

लातूर जिल्ह्यासाठी जलसंवर्धन ही महत्वाची बाब असल्याने अटल भूजल योजना जिल्ह्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर द्यावा. शाश्वत विकासाच्या नऊ ध्येयांमध्ये ग्रामपंचायतींना जलसमृद्ध गाव आणि हरित व स्वच्छ गाव अशी दोन ध्येये देण्यात आली आहेत. अटल भूजल योजनेतील 135 गावांनी ही ध्येय साध्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा. भूजल मित्रांनी याविषयी लोकांमध्ये जागृती करून लोकसहभाग वाढवा, असे श्री. गोयल यांनी सांगितले.

सन 2013 मध्ये भूजल सर्वेक्षण यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार अतिशोषित, शोषित आणि अंशतः शोषित गावांची निवड अटल भूजल योजनेसाठी करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील 135 गावांमध्ये ही योजना राबविली जात आहे. मागणी व पुरवठा व्यवस्थापनाच्या सूत्राचा अवलंब करून भूजल साठ्यात शाश्वतता आणणे, गुंतवणुकीच्या अभिसरणातून जलसंधारणासोबतच भूजल पुनर्भरणाच्या कामांना प्राधान्य देणे, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करून भूजल वापर मर्यादित करणे आणि सिंचन व्यवस्थापनात सुधारणा आणणे, हे अटल भूजल योजनेचे उद्दिष्ट असल्याचे श्री. पेटकर यांनी यावेळी म्हणाले. तसेच या योजनेविषयी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करणारा लातूर हा पहिलाच जिल्हा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी प्रशांत माने यांनी यावेळी कमी पाण्यावर येणाऱ्या शेतपिकांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन श्री. नाईक यांनी केले. दीपप्रज्वलन आणि कलश पूजनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले. अटल भूजल योजनेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन, भूजल मित्रांना ओळखपत्रांचे वाटप आणि योजनेच्या अनुषंगाने आयोजित विविध स्पर्धांमध्ये बक्षीस वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.

Post a Comment

أحدث أقدم