ऊस कारखान्यांवरील वजन काट्याविषयीप्रमाणित संचालन कार्यप्रणाली जाहीर

ऊस कारखान्यांवरील वजन काट्याविषयी
प्रमाणित संचालन कार्यप्रणाली जाहीर

 लातूर: शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करताना फसवणूक होवू नये, यासाठी वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक आणि साखर आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने साखर कारखान्यातील वजन काट्याविषयी प्रमाणित संचालन कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्यात आली आहे. त्यानुसार साखर कारखान्याच्या काट्याबाबत शेतकऱ्याना शंका असल्यास शेतकरी खाजगी वजन काट्यावर वजनाची खात्री करु शकतात. जर कारखान्याने खाजगी काट्यावरील वजन नाकारल्यास किंवा त्रास दिल्यास या बाबतची तक्रार संबंधित प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयाकडे देता येणार आहे.
साखर कारखान्यातील वजन काट्याच्या वे-इंडिकेटरलाच प्रिटींग सुविधा उपलब्ध असली पाहिजे. याद्वारे देण्यात येणाऱ्या पावतीवर वाहन क्रमांक नोंद करून सही शिक्क्याची पावती शेतकऱ्यास देण्यात यावी. काट्याच्या लोड सेलच्या इंडिकेटरपर्यंतच्या केबल्सला कोणतेही छुपे उपकरण जोडलेले नसावे किंवा केबल कट केलेली नसावी. वजन काट्याचे एक इंडिकेटर बाहेरील बाजूस लावलेले असावे, जेणेकरुन शेतकऱ्यास  वजन स्पष्टपणे दिसेल.
कारखान्यातील काट्याजवळ काट्याच्या क्षमतेच्या दहा टक्के प्रमाणित वजन ठेवणे बंधनकारक आहे. जेणेकरुन काट्याबाबत शंका असल्यास हे वजन काट्यावर ठेवून खात्री करता येईल. काट्याचे पडताळणी प्रमाणपत्र काट्याजवळ प्रदर्शित करणे बंधनकारक असून याविषयी शेतकऱ्यांना काही तक्रार असल्यास जिल्हा उप नियंत्रक, वैध मापन शास्त्र, लातूर व उस्मानाबाद जिल्हे यांच्या कार्यालयाकडे दूरध्वनी अथवा ई-मेलद्वारे तक्रार करता येईल, असे वैध मापन शास्त्र विभागाचे उप नियंत्रक स. या. अभंगे यांनी कळविले आहे.
येथे करता येणार तक्रार
खाजगी काट्यावरील वजन व कारखान्यातील वजन काट्यावरील वजनात तफावत आढळून आल्यास त्याबाबतची तक्रार जिल्हा उप नियंत्रक, वैध मापन शास्त्र, लातूर व उस्मानाबाद जिल्हे या कार्यालयाकडे करता येणार आहे. या कार्यालायासचा दूरध्वनी क्रमांक 02382-245207 असून  ई-मेल पत्ता aclmlatur@yahoo.in असा आहे. हेल्पलाईन क्रमांक 1800-11-4000 असून कंझ्युमर हेल्पलाईन क्रमांक 022-22622022 असा आहे.

Post a Comment

أحدث أقدم