जागतिक वारसा सप्ताहानिमित्त
विशेष लेखमाला (भाग-4)
लातूर जिल्ह्यातील शिलालेख आणि ताम्रपट
प्राचीन काळातील संस्कृती, वारसा शोधण्यासाठी भारतीय पुरातत्वीय, अभ्यासासाठी सर्वात महत्वाचे दस्तऐवज म्हणजे दगडावर कोरलेली तत्कालीन लिखित भाषा म्हणजेच शिलालेख आणि जाड तांब्याच्या पत्र्यावर कोरलेली भाषा म्हणजेच ताम्रपट.. ह्या दोन गोष्टीवरून त्या संस्कृतीचा शोध आणि बोध घेतला जातो...यापेक्षाही प्राचीन काळाचा शोध उत्खनन करून.. त्यात सापडलेली खापरी तुकडे, इतर भांडी यावर काळ आणि संस्कृतीचा अभ्यास होतो. आपल्या देशात भारतीय पुरातत्वीय विभाग, राज्य पुरातत्व विभाग.. हे देशातील नामवंत पुरातत्वीय अभ्यासक,पुरातत्वीय
अभ्यास करणाऱ्या संस्थाच्या मदतीने...ह्याचे वाचन, प्रयोगशाळेत यावर प्रक्रिया करून याचा काळ काढला जातो... हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे असा पुरावा लातूर जिल्ह्यात आढळून आला आहे. त्यावरून लिखित इतिहास लिहला गेला.
लातूर जिल्ह्यातील सर्वात प्राचीन संदर्भ शक ५२०-५२१ (इ.स.५९९) च्या कासारशिरसी ताम्रपटाद्वारे उपलब्ध आहे. हा ताम्रपट मु.पो. कासारशिरसी (ता. निलंगा) येथील श्री. दिनकरराव बाळाजीराव पाटील यांच्या घरी उपलब्ध झाला. हा ताम्रपट तीन पत्र्यांचा व ५० ओळींचा आहे. या ताम्रपटामुळे या परिसरातील काही प्राचीन स्थलनामे प्रथम प्रकाशात आली. सोबत देवणी येथील देवनदीचा प्रथम संदर्भ येथे प्राप्त होतो. देव नदी आणि प्राचीन मंजरी (वांजरा / माजरा) नदी संगमासोबत मंजरी नदी स्रोतसंगम- हेच दानभूमीचे स्थल आहे. यातील अलंदी हे ग्रामनाम अनंदि म्हणजे जवळच असलेले आळंदी हेच असावे. संगमापासून जवळच सावली हे प्राचीन सावल्लीग्राम असे आहे. जवळच असलेले प्राचीन खेर गाव आजचे खेड असावे. तसेच चंदवुरि हे आजचे चांदोरी असावे. प्राचीन कुसुवंडूरु हे आजचे कुसनूर आहे. यातील काही ग्रामनामे उपलब्ध नाहीत.
या जिल्ह्यातील दुसरा प्राचीन संदर्भही कासारशिरसी ताम्रपटातून प्राप्त होतो. याचा काळ शक ६१९ (इ.स. ६९७) असा आहे. या ताम्रपटातील काही संदर्भ प्रथम स्पष्ट होत नव्हते. हा ताम्रपट तीन पत्र्यांचा आणि ४२ ओळींचा असून भाषा संस्कृतच आहे. या ताम्रपटामुळे काही नवे संदर्भ प्राप्त होऊन नवा आशय निर्माण होतो. "चल्लिकी" म्हणजे चालुक्यांचे मूळ नाव. हा भाग खरोसा लेणी परिसराचा आहे. हा भाग किल्लारीच्या जवळ आहे.
लातूर जिल्ह्याच्या अनेक गावांना ताम्रपट आहे.. सु. ग. जोशी यांनी अत्यंत कष्टपूर्वक गावागावात जाऊन शोधले आहेत. त्यावर अभ्यास केला आहे. लातूर जिल्ह्यात मांजरा नदीच्या खोऱ्यात पुण्याच्या डेक्कन पुरातत्व महाविद्यालयाने उत्खनन केले असून त्यात यापेक्षाही प्राचीन बाबी समोर आल्या आहेत.
(क्रमशः)
- युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर
إرسال تعليق