रोटरी क्लबच्या कार्यात समानतेचा भाव- माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे

 रोटरी क्लबच्या कार्यात समानतेचा भाव- माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे


    लातूर/प्रतिनिधी: सामाजिक क्षेत्रात रोटरी क्लबने उल्लेखनीय कार्य केलेले आहे.प्रत्येक क्षेत्रात रोटरीने केलेले कार्य दीपस्तंभा प्रमाणे उभे आहे.समाजातील सर्व घटकांसाठी रोटरी क्लब समानतेच्या भावनेतून कार्य करते.रोटरी क्लबचा हा समानतेचा भाव शिकण्यासारखा आहे,असे मत माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केले.
    रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने टाऊन हॉलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रोटरी बिल्ड एक्सपो २०२३ च्या समारोप समारंभात गोजमगुंडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष वीरेंद्र फुंडीपल्ले तर मंचावर रोटरीचे माजी गव्हर्नर डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे,सचिव अमोल दाडगे,प्रोजेक्ट चेअरमन रवी जोशी व अनुप देवणीकर,रवींद्र बनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलताना विक्रांत गोजमगुंडे म्हणाले की,रोटरी क्लब दरवर्षी एक थीम घेऊन कार्य करीत असते.यावर्षीची त्यांची संकल्पना अतिशय उत्तम आहे.शासन व लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यात जिथे कमी पडतात तिथे रोटरी पुढे होऊन काम करते.समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा सेतू म्हणून रोटरी क्लब काम करते. सामाजिक कार्यावर रोटरीची निष्ठा असून ही निष्ठा इतरांनीही शिकली पाहिजे.रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनने आयोजित केलेल्या एक्सपोमध्ये मोठ्या संख्येने स्टॉल आले.रोटरी क्लबवर असणाऱ्या विश्वासामुळेच स्टॉलधारकांची संख्या वाढली.रोटरीच्या कार्यक्रमात नियोजन उत्तम असते,हा विश्वास सर्वांना आहे.त्यामुळेच हा बिल्ड एक्सपो यशस्वी झाला.रोटरी क्लबच्या कार्यात सातत्य असते.त्यामुळे पुढील वर्षीही असा एक्स्पो आयोजित केला जावा. उद्योजकांनी पुढील वर्षासाठी आत्ताच बुकिंग करावे असे आवाहनही त्यांनी केले.
   लातूर हे सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर आहे.या शहरात बिल्ड एक्स्पोच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राची माहिती देणारी दालने उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे आभार मानले.
    यावेळी बोलताना माजी गव्हर्नर डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे म्हणाले की,
कोविडमुळे व्यवसाय कोलमडून गेलेले आहेत.अशा काळात व्यवसायांना चालना मिळणे आवश्यक आहे.देशाची लोकसंख्या वाढत असून त्यासाठी नव्या शहरांची गरज आहे.नवे तंत्रज्ञान आवश्यक आहे. ते मिळवून देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनने हा एक्स्पो आयोजित केला.
एक्सपोमध्ये सहभागी झालेल्या व्यावसायिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया समाधानकारक आहेत. रोटरी क्लबचा प्लॅटफॉर्म  विश्वासाचा असून समाजाने साथ दिली तर यापेक्षाही अधिक काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ मधील १०० क्लबमध्ये रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे कार्य पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगून त्यांनी रोटरीच्या टीमचे कौतुक केले.
    प्रारंभी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.एक्सपोच्या आयोजनात सहकार्य करणाऱ्या विविध संस्था आणि मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.एक्सपोमध्ये सहभागी झालेल्या ७५ स्टॉलधारकांनाही स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.प्रोजेक्ट चेअरमन रवी जोशी यांनी बेस्ट स्टॉल धारकांच्या नावांची घोषणा केली.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. 
   स्टॉलधारकांच्या वतीने सुभाष कासले,शिवदास मिटकरी,विशाल भुतडा,नागनाथ शिरसे यांनी मनोगत व्यक्त करून रोटरीने आयोजित केलेला एक्सपो अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.रवींद्र बनकर यांनी डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे तर किशोर दाताळ यांनी विक्रांत गोजमगुंडे यांचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उमा व्यास तर आभार प्रदर्शन रवी जोशी यांनी केले.
   या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे पदाधिकारी तसेच रोटरीच्या विविध शाखांचे पदाधिकारी व सदस्य आणि शहरातील व्यावसायिक,नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم