बालकवींच्या कवितेला साद घालणारी देवदत्त मुंडेंची कविता-डॉ.श्रीपाल सबनीस

 बालकवींच्या कवितेला साद घालणारी देवदत्त मुंडेंची कविता-डॉ.श्रीपाल सबनीस



लातूर- बालकवींच्या कवितेला गवसणी घालणारी आणि पावसाच्या कवितेतून ग्रामीण संस्कृतीची वेगळी ओळख करून देणारी  प्रा.देवदत्त मुंडेंची कविता असल्याचे प्रतिपादन 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले..आज मयूर हॉटेलच्या सभागृहात झालेल्या प्रा.देवदत्त मुंडे यांच्या मी ती आणि पाऊस या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ.मधूकर सलगरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर,मन्मथ स्वामी महाविद्यालयाच्या प्राचार्या मधुमती पाटील होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी प्रा.देवदत्त मुंडे यांनी केले.
पुढे बोलताना श्रीपाल सबनीस म्हणाले की,आज मला या ठिकाणी भावकी आणि गावकीच श्रीमंत चित्र पाहायला मिळाले,मुंडे यांची कविता ही निसर्गाशी संवाद साधणारी,सत्याची कास धरणारी,प्रेम व प्रणयाचे मूल्यमापन करणारी आहे.निसर्गाच्या अनुरेणुशी एकरूप झालेली कविता ही मराठी काव्यप्रवाहात दुर्मिळ आहे.सकाळ,दुपार आणि संध्याकाळचा पाऊस भावनेत गुंफताना कवितेतील प्रश्नांची मालिका अपरिहार्यतेच्या संबंधाने संस्कृतीच्या शहाणपणाला निरुत्तर करणारी आहे.कलावंत हा नेहमी विश्व कल्याणाची भूमिका मांडत असतात,कलावंत आणि विचारवंत हे सत्याची कास धरत असतात,कल्याणकारी विचारच कलावंताचा ध्येयवाद आहे,त्यामुळे कवीने स्त्री पुरुषासह समग्र सृष्टीचेच अद्वैत्य अधोरेखित केले आहे.कविता कुठेही कृत्रिम वाटत नाही तर अस्सल प्राकृतिक रंगात ती न्हाऊन जाते असेही ते म्हणाले.
              याप्रसंगी संजय जेवरीकर,प्राचार्या मधुमती पाटील,अ‍ॅड.श्यामसुदर राठी,प्रा.कुमार बंडे,प्रा.डॉ.धोंडीराम धुमाळे यांची समयोचित भाषणे झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शैलजा कारंडे यांनी केले तर आभार श्रीहरी मुंढे यांनी मांडले.

Post a Comment

أحدث أقدم