जगात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या भारतीय संस्कृती आणि परंपरेची जपणूक करण्याची तरुण पिढीवर जबाबदारी

 जगात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या भारतीय संस्कृती आणि परंपरेची जपणूक करण्याची तरुण पिढीवर जबाबदारी

लातूर एमआयटी येथे आयोजित व्याख्यानात विचारवंत डॉ. पुष्पिता अवस्थी यांचे प्रतिपादन

 

लातूर – पाश्चिमात्य राष्ट्रात घर, परिवार, प्रेम, नातेसंबंध, कुटुंब व्यवस्था संपुष्ठात आली आहे. मात्र भारतीय संस्कृतीमुळे समाज जीवन आजही टिकून आहे. तेव्हा जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या भारतीय संस्कृतीची आणि परंपरेची जपवणूक करण्याची जबाबदारी भारतीय तरुणांवर आहे, असे प्रतिपादन प्रथितयश लेखिका, कवयत्री तथा विचारवंत डॉ. पुष्पिता अवस्थी यांनी केले.

लातूर येथील माईर एमआयटी शिक्षण संकुलात “भारतीय संस्कृती व परंपरा आणि आजचा युवक” या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. पुष्पिता अवस्थी बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. यावेळी काशी बनारस येथील ज्येष्ठ तत्त्वज्ञ, विचारवंत डॉ. योगेंद्र मिश्रा, माईर एमआयटीचे विश्वस्त तुळशीराम दा. कराड, सहव्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड-नागरे, कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड, कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड, अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती.

विश्व स्तरावर विश्वाची चिंता दूर करण्यासाठी काम करणारे विश्वधर्मी डॉ. विश्वनाथजी कराड हे खऱ्या अर्थाने विश्वगुरु आहेत. जगात सुख, शांती, समाधान लाभावे यासाठी अहिंसेच्या मार्गाने प्रत्येकाने जावे याकरीता त्यांनी चळवळ सुरु केली आहे. भारतीय संस्कृतीसोबत तरुणांना जोडण्यासाठी शिक्षणाला आध्यात्माची जोड दिली. त्यांचे कार्य प्रेरणादायी व अभिमानास्पद असल्याचे सांगून यावेळी पुढे बोलताना लेखीका डॉ. पुष्पिता अवस्थी म्हणाल्या की, उच्च शिक्षण घेवून परदेशात जाणे म्हणजे प्रगती हा समज अत्यंत चुकीचा आहे. स्वहित डोळ्यासमोर ठेवून उच्च शिक्षण घेताच जर डॉ. विश्वनाथ कराड परदेशात गेले असते तर काय स्थिती राहिली असती असा प्रश्न उपस्थित करुन एमआयटीचे आज निर्माझ झालेले वटवृक्ष पहाता आले नसते. केवळ त्यांच्यामुळेच अनेक संस्था उभ्या राहिल्या त्यातुन लाखो गोर-गरीब गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त होऊन हजारो जणांना रोजगार उपलब्ध्‍ झाला.

देशातील बहुतांशी उच्च शिक्षित तरुण सुखापोटी विदेशात काम करीत आहेत. ही अत्यंत दुर्दैवी बाब असून खऱ्या अर्थाने भारत देशातील तरुणच जगातील अनेक देश चालवत आहेत. विदेशात व्यक्ती केंद्रित व्यवस्था उदयास आल्याने घर, परिवार, प्रेम, नातेसंबंध, कुटूंब व्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. मात्र भारतीय संस्कृती आणि परंपरा यामुळे समाज जीवन टिकून आहे. परदेशात जाणारे उच्च शिक्षित तरुण यांचे हात देशातच कार्यरत राहिले तर देशाच्या प्रगतीबरोबरच जगातील सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृती, पंरपरा जतन करण्यास मदत होईल असे डॉ. अवस्थी यांनी सांगीतले.

यावेळी बोलताना डॉ. योगेंद्र मिश्रा म्हणाले की, आहार, आचार, विचार, वाणी, साधना, निष्ठा यावर भारतीय संस्कृती आणि परंपरा आवलंबून आहे. वाणी बिघडली तर आपसात वादविवाद होतात. संत विचाराला जोडल्यास ज्ञान आणि संयम प्राप्त होतो. ही भारतीय संस्कृती वाचवण्यासाठी आणि तिचे जतन करण्यासाठी विश्वनाथ कराड यांचे कार्य सुरु असल्याचे सांगून त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य येणाऱ्या काळासाठी दिशादर्शक ठरेल. शरीरात मानवी मनाची गरज आहे. आजच्या युवकांनी सत्य-असत्य ओळखून जिवनाची वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. तर येत्या काळात तळेगाव दाभाडे येथील एमआयटी परिसरात विश्वनाथ विश्वेश्वर महादेव मंदिराची उभारणी करण्यात येणार असल्याचे सांगुन डॉ. सुचित्रा कराड-नागरे यांनी संस्थेच्या कार्याची माहीती दिली.

यावेळी बोलताना डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, आध्यात्म म्हणजे अंधश्रध्द नव्हे तर जगण्याचे शास्त्र आहे. जगात शांतता प्रस्थापीत होण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. पाश्चात्य संस्कृतीचे मोठे आक्रमन होत असताना भारतीय तरुणांनी त्यात वाहून न जाता जगाला दिशा देणाऱ्या भारतीय संस्कृती आणि परंपरेची कास धरणे आवश्यक आहे. जिवनात प्रत्येकाने मोठे यश मिळवावे मात्र आपल्या मातृभूमीची नाळ तुटका कामा नये याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगीतले.

रामेश्वर सारख्या छोट्या गावात जन्म घेवून कोणतीच शिक्षणाची सुविधा नसताना उच्च शिक्षण घेवून डॉ. विश्वनाथजी कराड साहेब यांनी इतरांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी अनेक शिक्षण संस्था, विद्यापीठे उभा केली हे काम सोपे नव्हते. ही एक मोठी गगण भरारी आहे. कितीही अडचणी आल्या तरी निष्ठा आणि प्रयत्न त्यांनी कधीच सोडले नाहीत. त्यांनी जे जे स्वप्न पहिले ते सत्यात उतरविले याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, आध्यात्म आणि विज्ञानाची जोड घालून देशाला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. सर्वधर्म समभावाची संकल्पना रामेश्वर गावात विकसीत केली व आदर्श गाव म्हणून उदयास आणले. त्यांच्या संकल्पनेतून लातूर एमआयटीच्या माध्यमातून गोरगरीब गरजूंना आरोग्य सेवा देण्याचे काम केले जात आहे.

प्रारंभी अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक केले. शेवटी कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा यांनी केले. या कार्यक्रमास शैक्षणीक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळे, संचालिका डॉ. सरिता मंत्री, डॉ. वर्षा कराड, केशवकुमार झा, दंत महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. यतीशकुमार जोशी, फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष खत्री, नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य सरवनन सेना, मुख्य प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे, प्रशासकीय अधिकारी मधुकर गुट्टे, श्रीपती मुंडे, बळीराम हांडगे यांच्यासह एमआयटी शिक्षण संकुलातील विविध महाविद्यालयातील विभाग प्रमुख, डॉक्टर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

----------------------------------------

Post a Comment

أحدث أقدم