तत्त्वज्ञानावरच चालतोय जगाचा गाडा : डॉ. भराटे

 तत्त्वज्ञानावरच चालतोय जगाचा गाडा : डॉ. भराटे

म. बसवेश्वरमध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषदेचे उद्घाटन

लातूर : जिथे ज्ञान आणि प्रेमाचे शास्त्र कळते ते  तत्त्वज्ञान. भारताचा गौरवशाली इतिहास हा या तत्त्वज्ञानाचीच देण आहे. संपूर्ण जगाचा गाडा हा तत्त्वज्ञानावरच  चालतो आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोग व श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. रमेश भराटे यांनी केले. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषदेचे उद्घाटक म्हणून ते  बोलत होते.

महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर, आणि  अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात  'भारतीय व पाश्चात्य ज्ञानमिमांसा' या विषयावर  डॉ. एस. जी. निगळ यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद सुरु आहे. या परिषदेचे  उद्घाटन शुक्रवार दि. ३१ मार्च रोजी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सभागृहात झाले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव मन्मथाप्पा लोखंडे हे होते.  यावेळी संस्थेचे संचालक ॲड. श्रीकांताप्पा उटगे, अ.भा. तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र गायधने,  प्रा .  इ. आर. मठवाले,  प्रा .  माधवी कवी, प्र.प्राचार्य दिनेश मौने, उपप्राचार्य  राजकुमार लखादिवे,  डॉ.  सुनील साळुंके,  बालाजी जाधव, डॉ. सचिन इंगळे, संयोजिका डॉ. शितल येरूळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना डॉ. भराटे म्हणाले की, लातूर ही विद्येची पंढरी आहे आणि जिथे विद्या नांदते तिथे सर्वकाही असते. त्यामुळे ही तत्त्वज्ञान परिषद लातूरात होणे ही अभिमानाची बाब  आहे.

डॉ. सुरेंद्र गायधने यांनी देशभरातील तत्त्वज्ञानाच्या अध्यापक आणि अभ्यासकांना मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने  अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेची सुरुवात केल्याचे आणि त्या माध्यमातून तत्त्वज्ञानाच्या विविध शाखांच्या चिंतनाचा यज्ञ सुरु असल्याचे सांगितले. तसेच देशभरातील तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांना विविध भाषांमधील साहित्य उपलब्ध करून देण्यात अ.भा. तत्त्वज्ञान परिषद आपला वाटा उचलत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस. जी. निगळ यांनी,  आपण भारतीय तत्त्वज्ञान जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे दाखले देतो मात्र तरीही भारतावर अनेक शतके परकियांनी राज्य का केले ?  असा प्रश्न उपस्थित करून भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांनी यावर चिंतन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, तत्त्वज्ञान हा अदान-प्रदानाचा विषय आहे. तो वादविवादाचा विषय आहे. केवळ एकट्याने बोलून किंवा अभ्यास करून ते समजून घेणे शक्य होणार नाही. काही दशकांपुर्वीपर्यंत  ज्ञानावर भाषेची मक्तेदारी होती मात्र अलिकडे तत्त्वज्ञान हे लोकभाषांमध्ये  उपलब्ध होत आहे. ही चांगली बाब आहे. तत्त्वज्ञान हे बुद्धीला चालना देते. मानवी बुद्धीची ते कसोटी लावते असे सांगुन भारतीयच नाही तर पाश्चात्य आणि सुधारकांचे, संतांचे तत्त्वज्ञानही लोकभाषेत येऊन ते  शिकविले गेले पाहीजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना मन्मथाप्पा लोखंडे यांनी, स्वतंत्र होऊन केवळ ७५ वर्षांचा कालावधी उलटलेला असतानाही भारत आज जगाच्या पावला बरोबर पावले टाकत आहे. विविध माध्यमातून भारताने जगाला दिलेले तत्त्वज्ञान ही  सोन्याची तिजोरी आहे, असे सांगुन कमी वेळात तत्त्वज्ञान अंगिकारता आले पाहीजे आणि यातून जगाशी स्पर्धा करण्याची ताकद निर्माण झाली पाहीजे असे मत मांडले.  आपली पावलं योग्य दिशेनं पडतात की नाही हे पाहणं आज गरजेचं झालं असून त्यासाठी काय नियोजन करायला हवं याचा उहापोह या राष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषदेतून व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या 'भारतीय व पाश्चात्य ज्ञानमीमांसा' या  ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच डॉ. शितल येरूळे लिखित 'भारतीय नास्तिक दर्शनातील आत्म विषयक संकल्पना' व डॉ. गोदावरी भुसारे लिखित 'जैन आणि योग दर्शनातील नीती आणि मोक्ष' या ग्रंथांचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या तत्त्वज्ञान विभागप्रमुख डॉ. शितल येरुळे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. गणेश बेळंबे यांनी तर आभार प्रा. अलका चिखुर्डेकर यांनी मानले. या परिषदेत राज्यभरातून तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सहभागी झाले आहेत. शनिवारी याचा समारोप होणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم