पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामास प्रारंभ
औसा: प्रतिनिधी-रब्बी हंगाम केव्हाच संपला असून, उन्हाळी पिकांची जोपासणा केली जात आहे. परंतु अवकाळी पाऊस व वादळी वारे अधूनमधून येऊ लागल्यामुळे शेती कामांना खीळ बसली आहे. अवकाळी पाऊस सतत हजेरी लावत असल्याने शेतक-यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या अवकाळी पाऊस थांबला असल्याने बळीराजा नव्या उमेदीने खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामास पुन्हा एकदा सुरुवातीला आहे.
गत खरीप व रब्बी हंगाम अतिवृष्टी व विविध रोगांमुळे म्हणावा तेवढा शेतक-यांच्या हाती लागला नाही. पाण्याची मुबलकता पाहून शेतक-यांनी खरीप व रब्बी हंगामात जीवापाड मेहनत घेतली. परंतु यश पदरात पडले नाही. खरे पाहिले तर शासनाने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना मदत करायला पाहिजे होती. परंतु शासनाने नुसते आश्वासन देऊन शेतक-यांना आशेवर ठेवले. अतिवृष्टीची मदत सर्व शेतक-यांना मिळेल, असे वाटले होते. परंतु शासनाची मदत गरीब शेतक-यांना मिळाली नाही.
जुलै व ऑगस्ट दोन महिन्यांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे मे महिन्यापर्यंत पाणी राहील, असे शेतक-यांना वाटले होते. परंत मे महिन्याच्या पहिल्या आठवडयातच विहिरी व तलावांनी तळ गाठला आहे. पाण्याची मुबलकता पाहून शेतक-यांनी यावर्षी उदगीरसह परिसरातील गावात गावांत उन्हाळी भुईमूग, उन्हाळी सूर्यफूल, उन्हाळी सोयाबीन, केळी, ज्वारी आदी पिकांची लागवड केली आहे. मे महिन्यात अवकाळी पाऊस पडेल असे शेतक-यांना वाटले नव्हते. अवकाळी पावसामुळे वाळत ठेवलेला कांदा भिजून गेला. गारपिटीमुळे गावरान आंब्याचे प्रचंड नुकसान झाले. तसेच वादळी वा-याने ज्वारी, सूर्यफूल, भुईमूग, आदी पिकांचे नुकसान झाले. १५ दिवसांपासून अवकाळीचा तडाका तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली होती. आता पुन्हा अवकाळीचे सावट दूर झाल्याने पुन्हा एकदा बळीराजांनी कंबर कसून नव्या उमेदीने पेरणीपूर्व मशागतीच्या कामास प्रारंभ केला आहे.
إرسال تعليق