लातूर क्रेडाईने सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून द्यावीत : माजी मंत्री आ. अमित देशमुख

 लातूर क्रेडाईने सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून द्यावीत : माजी मंत्री आ. अमित देशमुख

---------
लातूर, (प्रतिनिधी) : लातूर शहर हे झपाट्याने वाढणारे शहर म्हणून नावारूपास येत आहे. गुणवत्ता शहर म्हणून लातूर शहराचा नावलौकिक आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी या शहराची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आदरणीय विलासराव देशमुख यांचे या शहरासंदर्भात बारकाईने लक्ष ठेवून आपलं घर पुढं नेण्याचे काम केले. लातुरातील गोलाईसारखी वास्तू ही स्थापत्य प्रकारातील एक वेगळे उदाहरण आहे. गोलाई निर्मितीला शंभर वर्ष पूर्ण झाले असून, शताब्दी वर्षाच्या निमित्ताने महापालिका प्रशासनाने केंद्र व राज्य सरकारकडे शंभर कोटींच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत मदत मिळावी यासाठी प्रस्ताव देण्यात यावा. जेणेकरून या रक्कमेची लातूर शहराच्या विकासासाठी मदत होईल. उद्याचे लातूर घडविण्याची भूमिका ही बिल्डर्सची आहे. ते क्रेडाईच्या माध्यमातून पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करून यापुढील लातूरकरांसाठी कायद्याच्या चौकटीत राहून नियमानुसार कामे झाली पाहिजेत. शहरातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.

लातूर क्रेडाईच्या वतीने २०२३-२५ या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमित देशमुख, लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, महाराष्ट्राचे क्रेडाई अध्यक्ष प्रमोद खैरनार, क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील फुरडे, सहसचिव डॉ. धर्मवीर भारती, लातूर क्रेडाईचे मावळते अध्यक्ष सुबोध बेळंबे व सचिव महेश नावंदर, नूतन अध्यक्ष जगदीश कुलकर्णी व नूतन सचिव संतोष हत्ते यांची विशेष उपस्थिती होती.

स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना आदरांजली व्यक्त करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. नूतन अध्यक्ष जगदीश कुलकर्णी व सचिव संतोष हत्ते यांच्याकडे मावळते अध्यक्ष सुबोध बेळंबे व सचिव महेश नावंदर यांनी मानदंड सुपुर्द केला. क्रेडाईचे मावळते सचिव महेश नावंदर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील प्रास्ताविक केले. तर मावळते अध्यक्ष सुबोध बेळंबे यांनी लातूर क्रेडाईचे २०२१ ते २०२३ या कालावधीत क्रेडाईने केलेल्या कामांची माहिती दिली. या वेळी बोलताना सुबोध बेळंबे म्हणाले, लातूर क्रेडाईने २०२१-२३ या काळात क्रेडाई आपल्या दारी हा अभिनव उपक्रम साजरा केला. या उपक्रमाद्वारे जवळपास ८७ बिल्डर्सची नोंद झाली व क्रेडाईचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. यामुळे लातूरकरांना व बिल्डर्सना याचा फायदा झाला.

या वेळी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष व मावळते अध्यक्ष यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच क्रेडाईच्या वतीने २०२५-२७ या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून उदय पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच किरण मंत्री, उपाध्यक्ष अमोल मुळे, संतोष हत्ते, आशीष कामदार, विष्णु मदने, श्रीकांत हिरेमठ, दीपक कोटलवार, डॉ. धर्मवीर भारती, नागनाथ गित्ते, वुमन विंग्सच्या रिचा नावंदर, जयनंदा गित्ते, यांचाही आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लातूर क्रेडाईसाठी स्वतःचे कार्यालय असावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. या वेळी लातूर येथील पापाशेठ ताथोडे यांनी क्रेडाईच्या कार्यालयासाठी स्वतःच्या मालकीची जागा देण्याचे जाहीर केले. त्यामुळे आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते पापाशेठ ताथोडे व अ‍ॅड. संजय पांडे यांचाही सत्कार करण्यात आला.

नूतन अध्यक्ष जगदीश कुलकर्णी यांनी २०२३-२५ या कालावधीसाठी क्रेडाईच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून कमिट्या स्थापन करून लातूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी क्रेडाई सर्वोतोपरी मदत करील, असे आश्वासन देऊन क्रेडाईच्या माध्यमातून लातूरला जनरल बॉडीची मिटिंग तसेच लातूर क्रेडाईला स्वतःच्या जागेत कार्यालय व लातुरात प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सांगून या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतची भूमिकाही विषद केली. या वेळी महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील फुरडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी लातूर क्रेडाईच्या माध्यमातून सर्वच प्रश्न सोडविण्यात आले असून, महापालिकेच्या हद्दवाढीचाही प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यापुढे क्रेडाईच्या पदाधिकार्‍यांना संपूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

या वेळी बोलताना अमित देशमुख म्हणाले, लातूर शहरातील बांधकामे ही आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय दर्जाची झाली पाहिजे. आता जग जवळ आले आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम बिल्डर्सच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. नियमानुसार व कायद्याच्या चौकटीत राहून कामे होणे गरजेचे असून, यासाठी कोणालाही कोणाच्या दारात जाण्याची गरज नाही. लातूर शहरात क्रेडाई व लातूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कचरामुक्त शहर, रेन हार्वेस्टिंग, ग्रीन लातूर ही संकल्पना अस्तित्वात यावी अशी अपेक्षा व्यक्त करून लातूर शहरातील वाहतुकीच्या प्रश्नावरही क्रेडाईने शहरात एखादा पार्किंगसाठी पथदर्शी प्रकल्प उभा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. लातूरची गुणवत्ता शिक्षणामुळे सर्वत्र चर्चिली गेली आहे. तीच गुणवत्ता बांधकाम क्षेत्रातही जोपासली गेली पाहिजे. त्यामुळे ज्याचे चांगले काम आहे त्याला भविष्यात मागणी निश्चितच मिळणार आहे. लातूरला शेजारच्या कर्नाटक, आंध्रप्रदेश व राज्यातील अनेक भागांतून लोक शिक्षणासाठी येत असतात. त्यानंतर अनेकजण येथेच स्थायिकही झालेले आहेत. लातूरकरांना सर्व सोयींनी युक्त सेवा मिळाल्या तर त्याचे निश्चितच लातूरकर स्वागत करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जेवरीकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष उदय पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मावळते अध्यक्ष सुबोध बेळंबे, सचिव महेश नावंदर, नूतन अध्यक्ष जगदीश कुलकर्णी, सचिव संतोष हत्ते, डॉ. धर्मवीर भारती, दीपक कोटलवा, उदय पाटील, किरण मंत्री, उपाध्यक्ष अमोल मुळे, आशीष कामदार, विष्णु मदने, श्रीकांत हिरेमठ, नागनाथ गित्ते, वुमन विंग्सच्या रिचा नावंदर, जयनंदा गित्ते आदींनी विशेष प्रयत्न केले.

Post a Comment

أحدث أقدم