एकाच छताखाली विविध योजनांचा लाभ देणारा
‘शासन आपल्या दारी’ उपक्रम सर्वसामन्यांसाठी उपयुक्त
-आमदार संजय बनसोडे
लातूर: ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देणारा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम उपयुक्त आहे. यामाध्यमातून योजनेच्या लाभासोबतच विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी मदत होत असल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने जळकोट येथील तिरुमला मंगल कार्यालयात आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार श्री. बनसोडे बोलत होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, प्रभारी उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ , जिल्हा प्रशासन अधिकारी रामदास कोकरे, तहसीलदार सुरेखा स्वामी, नगराध्यक्ष प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथ किडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठल चव्हाण, गट विकास अधिकारी नरेंद्र बेडवार, तालुका कृषि अधिकारी आकाश पवार यावेळी उपस्थित होते.
गोरगरिबांच्या कल्याणासाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती अनेकदा लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमामुळे अशा योजनांची माहिती नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होवून योजनांची माहिती घ्यावी, तसेच या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन आमदार श्री. बनसोडे यांनी केले. तसेच जळकोट तालुक्यात विविध विकास कामे गतीने सुरु आहेत. येत्या काही दिवसात तिरू बॅरेज, जलजीवन मिशन यासह प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण होणार असून त्याचा लाभ नागरिकांनी होईल, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात मुखकर्करोग निदानासाठी मोहीम राबविणार
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. औसा, उदगीर नंतर जळकोट येथे तिसरा कार्यक्रम होत असून याठिकाणीही विविध विभागांच्या योजनांच्या लाभार्थ्यांना लाभपत्राचे वितरण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. जिल्ह्यात महिलांमधील कर्करोगाच्या निदानासाठी राबविण्यात आलेल्या ‘संजीवनी’ उपक्रमाच्या धर्तीवर मुख कर्करोग निदानासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून यामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात 1 मेपर्यंत गाव नकाशावरील 4 हजार 980 रस्ते आणि वहिवाटीचे 1 हजार 100 रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून जिल्ह्याला ‘सोयाबीन सीड हब’ बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. तसेच सोयाबीन लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘आयुष्मान भारत’ योजनेचा लाभ घ्यावा
‘शासन आपला दारी’ उपक्रमाचे तालुकास्तरावर आयोजन करून शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यात येत आहे. यासोबतच विविध विभागांच्या योजनांची माहिती दिली जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक लाभाची कामे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत. तसेच जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर टोकन यंत्राचे वाटप केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बियाणे खर्चात बचत होणार असून उत्पन्नातही होईल. अशा विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अहिकारी अभिनव गोयल यांनी केले. तसेच आयुष्मान भारत योजना सर्वांसाठी उपयुक्त असून त्याचे कार्ड प्राप्त करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. तसेच सोयाबीन, तूर पिकाच्या अधिक उत्पन्नासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली.
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जळकोट तालुक्यात 15 जूनपर्यंत 7 हजार 500 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार असल्याचे तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी प्रास्ताविकात सांगितले.
विविध योजनांच्या 1 हजार 200 लाभार्थ्यांना लाभपत्राचे वितरण
जळकोट तालुक्यातील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या 1 हजार 200 लाभार्थ्यांना लाभपत्र, धनादेश वितरीत करण्यात आले. कृषि विभागाच्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना, सामुहिक शेततळे, कांदाचाळ, शेडनेट, वैयक्तिक शेततळे, पोकरा अंतर्गत विहीर, टोकन यंत्र, ट्रॅक्टर, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, आरोग्य विभागाच्या प्रधानमंत्री मातृ योजना, जननी सुरक्षा योजना, आयुष्यमान भारत कार्ड, एकात्मिक बालविकास सेवा योजन अंतर्गत मिनी पिठाची गिरणी, शिलाई मशीन, बेबी केअर कीट, नगरपंचायतीची प्रधानमंत्री स्वनिधी योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, महसूल विभागामार्फत संजय गांधी निराधार योजनेचे लाभपत्र, नैसर्गिक आपत्ती धनादेश, पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिका वितरीत करण्यात आल्या. या उपक्रमांतर्गत 15 जूनपर्यंत 7 हजार 500 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
إرسال تعليق