राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांनी गौरव झाल्याबद्दल
लातूर आयएमएच्या वतीने कर्तृत्ववान जिल्हा प्रशासनाचा सन्मानलातूर : आयएमएच्या लातूर शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचा राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांनी गौरव झाल्याबद्दल सत्कार व सन्मान करण्यात आला.
लातूर जिल्हा प्रशासनाला देशपातळीवरील प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनचा प्रथम पुरस्कार देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग द्वारे राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागातील जनतेचा आरोग्यमान उंचावण्यास मदत झाली. याची नोंद केंद्र शासनाच्या पातळीवर घेण्यात आली. इंडियन मेडिकल असोसिएशन लातूरतर्फे अध्यक्ष डॉ. अनिल राठी, सचिव डॉ. आशिष चेपुरे , कोषाध्यक्ष डॉ. अर्जुन मंदाडे, वुमन्स विंगच्या अध्यक्ष डॉ. प्रीती बादाडे , सचिव डॉ. प्रियांका राठोड यांनी या तिन्ही कर्तृत्ववान प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करून सन्मान केला.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांचे व रुग्णालयांचे महत्त्वाचे योगदान आहे असे सांगितले. आगामी काळात देखील आयएमएचे सहकार्य अपेक्षित आहे. कोरोना काळातील प्रशासनाला आयएमएच्या सदस्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे लातूर जिल्ह्यातील जनतेला खूप मोठा दिलासा मिळाला याची आठवणही त्यांनी करून दिली. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करताना लातूर जिल्ह्याचा आरोग्य निर्देशांक देश पातळीवर सन्मानित करण्यात आला. याचे श्रेय डॉक्टर व आरोग्य यंत्रणेला जाते असे सांगितले. ग्रामीण भागात शासनाच्या आरोग्य योजना योग्य प्रकारे राबवल्या व त्याच्या नोंदी ठेवल्या तर संशोधनास वाव मिळतो व वस्तुस्थिती कळण्यास मदत होते. आयएमएच्या डॉक्टरांची ह्या कामात पुष्कळ मदत झाली आहे आणि होत असते असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. लातूर जिल्ह्यातील दूरवरच्या ग्रामीण भागातील जनतेला तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याचा फायदा मिळावा यासाठी आयएमएच्या सहकार्याने टेली मेडिसिन यंत्रणा राबवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलग्रस्त भागात अतुलनीय कामगिरी बजावून आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवताना नक्षलवादांचा केलेला मुकाबला याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य चक्र देऊन सन्मान करण्यात आला. या सत्कारास उत्तर देताना सोमय मुंडे म्हणाले की, आपले पालक देखील डॉक्टर असल्यामुळे वैद्यकीय व्यवसायाच्या बाबतीत आपणास नितांत आदर आहे व आयएमएच्या अडचणी सोडविण्यासाठी आपले नेहमीच सहकार्य राहील. यावेळी गडचिरोलीत सेवा देताना आलेला अनुभव त्यांनी उपस्थितांसमोर प्रस्तुत केला. आयएमएचे अध्यक्ष डॉ.अनिल राठी या सत्कार सोहळ्यात बोलताना म्हणाले की, लातूर जिल्ह्याला उच्चशिक्षित व कर्तव्यदक्ष असे अधिकारी लाभल्यामुळे जनतेचे आरोग्य उंचावण्यास मदत झालेली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला आयएमएच्या सदस्यांची मदतीची गरज भासेल, त्यावेळेला सर्व सदस्य तत्पर असतील. त्याचबरोबर डॉक्टर व रुग्णालयांच्या अडचणींबद्दल प्रशासनाने सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रुग्ण सेवा देताना डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णालय व पोलीस यांचा सुसंवाद आवश्यक आहे. तसेच पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विषयक प्रश्नांसाठी आयएमएतर्फे विविध उपक्रम राबविले जातील असेही डॉ. राठी यावेळी म्हणाले. डॉ. सुरेखा काळे यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोरोना काळात तत्परतेने केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांचा देखील सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आयएमएचे कार्यकारिणी सदस्य डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. हर्षवर्धन राऊत डॉ. राजेश दरडे, डॉ. जितेन जयस्वाल, डॉ. दीपक गुगळे, डॉ. अभय कदम, डॉ. आमिर शेख, डॉ. अमोल लोंढे, डॉ. ऋषिकेश हरिदास, डॉ. संजय शिवपुजे डॉ. दीपक दाडगे, डॉ. मेहुल राठोड डॉ. वृंदा कुलकर्णी, डॉ. श्वेता काटकर, डॉ. संजीवनी तांदळे डॉ. विमल डोळे, डॉ. स्नेहल सांगळे डॉ. प्रिया पुरी, डॉ. राजीव कुलकर्णी, डॉ. अभिजीत यादव, डॉ. उदय देशपांडे, डॉ. विश्रांत भारती, डॉ. स्नेहल शिवपुजे, डॉ. मोनिका पाटील तसेच जेष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सुरेश भट्टड डॉ. ओमप्रकाश भांगडिया, डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. रमेश भराटे आदी मान्यवर उपस्थित होते.
إرسال تعليق