लातूरच्या सुसंस्कृत राजकारणातून सहकार क्षेत्राला उभारी
लातूर : प्रतिनिधी-लातूरच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा जोपासत आदरणीय नेत्यांच्या शब्दाचा सन्मान राखत ट्वेन्टिवन शुगर व्यवस्थापनाने चार पावले मागे घेत जय जवान जय किसान साखर कारखाना विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्यामार्फत चालू करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे हा कारखाना सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जय जवान जय किसान साखर कारखाना चालवण्यास देण्यासाठी राज्य शिखर बॅकेने काढलेल्या निवीदेसाठी ट्वेन्टिवन शुगर हा कारखाना पात्र ठरलेला असतांना राज्य शासनाच्या प्राधान्यक्रमानुसार हा कारखाना चालू करण्यासाठी खाजगीऐवजी सहकारी साखर कारखान्यालाच प्राधान्य दयावे म्हणून विठ्ठल साई साखर कारखान्याने उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. या याचीकेवर निकाल देतांना कारखाना कोणाला चालवण्यास देण्यासंदर्भात राज्य शिखर बँकेनेच निर्णय घ्यावा, असा आदेश दिला होता. या निकालानुसार ट्वेन्टिवन शुगरने नाहरकत प्रमाणपत्र दिल्या शिवाय विठ्ठल साईकडे कारखाना सुपूर्द करणे शक्य नव्हते.
जय जवान जय किसान साखर कारखानाचे संस्थापक माजी केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूचनेचा सन्मान राखत, आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शैलेश पाटील चाकूरकर यांचा आग्रह लक्षात घेता ट्वेन्टिवन शुगर व्यवस्थापनाने जय जवान जय किसान साखर कारखाना विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्यामार्फत चालू करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्वेंटीवन शुगरच्या वतीने हे नाहरकत प्रमाणपत्र लवकरच राज्य शिखर बँकेत सादर केले जाईल. त्यानंतर राज्य शिखर बँक नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करेल.
या संदर्भाने मंगळवार दि. २३ मे रोजी सांयकाळी बाभळगाव येथे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख तसेच प्रदेश सरचिटणीस शैलेश पाटील चाकूरकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीस प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, विलास बँकेचे उपाध्यक्ष अॅड. समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे आदीजण उपस्थित होते, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विठ्ठल साई साखर कारखान्यामार्फत जय जवान जय किसान साखर कारखाना चालवण्यासाठी शैलेश पाटील चाकूरकर यांना शुभेच्छा दिल्या तर प्रदेश सरचिटणीस शैलेश पाटील चाकूरकर यांनीही आमदार अमित देशमुख व ट्वेंटीवन शुगर व्यवस्थापनाचे यावेळी आभार मानले.
إرسال تعليق