दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी लवकरच ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ उपक्रम

दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी लवकरच ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ उपक्रम

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी घेतला आढावा
ग्रामस्तरावर जनजागृती करण्याच्या सूचना

 लातूर/प्रतिनिधी: दिव्यांग बांधवांना आवश्यक विविध कागदपत्रे, प्रमाणपत्रे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी लवकरच जिल्हास्तरावर ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ या एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने करावयाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आढावा घेतला. तसेच या उपक्रमाविषयी ग्रामस्तरावर जनजागृती करून लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहचविण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ उपक्रमाविषयी झालेल्या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दिव्यांग बांधवांना युडीआयडी कार्डसह विविध शासकीय कागदपत्रे, प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासह विविध शासकीय योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून कौशल्य विकास, समाज कल्याण, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महसूल विभाग, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, राज्य परिवहन मंडळ आणि ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ, प्रमाणपत्रे यावेळी वितरीत करण्याचे नियोजन आहे.

*युडीआयडी कार्ड वितरणास गती द्यावी : जिल्हाधिकारी*

दिव्यांग बांधवांना कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी युडीआयडी कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे युडीआयडी कार्डसाठी ऑनलाईन पोर्टलवर नावनोंदणी केलेल्या दिव्यांग बांधवांची तपासणी आणि कार्ड तयार करण्याची कार्यवाही गतीने करावी. ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केलेल्या अर्जदारांची गावनिहाय यादी बनवून युडीआयडी कार्ड तयार करण्याबाबत पाठपुरावा करावा. तसेच ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ उपक्रमासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करून जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ, माहिती आणि आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم