सतार तबल्याच्या जुगलबंदीत अन शास्त्रीय गायनात रंगले लातूरकर

 सतार तबल्याच्या जुगलबंदीत अन शास्त्रीय गायनात रंगले लातूरकर

आवर्तच्या शतकपूर्ती संगीत महोत्सवास अभूतपूर्व प्रतिसाद




सुरुवातीला प्रख्यात गायिका विदुषी अश्विनी भिडे देशपांडे, स्वागत अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख, उस्ताद शाकीर खान, पंडित मुकेश जाधव कार्यक्रम प्रमुख विशाल जाधव, अतुल देऊळगावकर, अजित जगताप यांनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून दुसऱ्या दिवशीच्या संगीत महोत्सवाचे सुरुवात केली. मान्यवर कलावंतांचे स्वागत आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने स्मृतिचिन्ह, ग्रंथ देवून झाले त्यानंतर आवर्तनच्या ९९ संगीत सभांच्या संदर्भातील लेखाजोखा येणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
       इटावा घराना शाकीर खाँ यांनी रूपक तालात राग यमन मध्ये मासितखाणी गत सादर केली. त्यांनी अत्यंत भावपूर्ण तेवढेच कल्पकतेने आलाप सादर केले.जोड झाला हा प्रकार अत्यंत तयारीने सादर केला. मंद्र सप्तकासोबतच अती तार सप्तकात केलेले वदन कल्पनातीत होते. अतीत अनागत ग्रहातून श्रोते डोलत होते. कधी धीरगंभीर तर कधी पर्जन्यधारे प्रमाणे वादन करून श्रोत्यांना चिंब करून टाकले. अंगुली नैपुण्य व कल्पनातीत तयारी हे त्यांच्या वादनाचे वैशिठ्य होते. त्यांच्या वादनाने परमानंद काय असतो याची रसिकांना अनुभूती आली.
     त्यानंतर त्यांनी धून सादर करून उपस्थितांचे रंजन केले. श्रोत्यांनी दिलेली दाद पाहून "मैने ऐसा ओडीडीयंस जिंदगी में पहिली बार देखी है" असे लातूरच्या श्रोत्यांविषयी गौरवोद्गार काढले.
लातूरचे भूमिपुत्र पंडित शांताराम चिगरी गुरुजींचे शिष्य व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबला वादक पंडित मुकेश जाधव यांची साथसंगत हे संगीत महोत्सवाचे मुख्य आकर्षण होते. त्यांनी सतारीला केलेली साथ तेवढीच तोलामोलाची ठरली. दाया बायाचे संतुलन, वादनाचे स्पष्टता, शुद्ध निकास आणि उत्स्फूरतपणे केलेले वादनामुळे श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. 
      संगीतोत्सवाची सांगता जयपूर आत्रोली घराण्याच्या  गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायनाने झाली. त्यांनी  ‘आली पिया आली सुंदर‘  ही जयजयवंती रागात बडा ख्यालाची बंदिश सादर केली. भरपूर अलापचारी, लयकारीने नटलेले बेहलावे व विविध तानाचे प्रकार सादर करून त्यांनी ख्याल भरला. त्यानंतर  ‘ सुंदर शाम सलोनी‘ ही दृत आडा चौतालात बंदिश सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर साडे सात मात्रेच्या तालात प्रतीक्षा या रागात  ‘कारी बदरिया‘  व तीनतालात ‘ प्रीतम बिन लागत नाही जिया‘  या बंदिशी सादर केल्या.
      त्यांना तबल्याची साथ प्रशांत पांडव यांनी केली तर संवादीनीची  साथ अभिनय रवंदे यांनी केली. डॉ. वृषाली देशमुख यांनी तानपुरा व स्वराली जोशी  यांनी तानपुरा साथ केली.

       आमदार अभिमन्यू पवार, आमदार विक्रम काळे, आमदार बाळासाहेब जाधव, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हाधकारी शोभा जाधव यांच्यासह बीड, धाराशिव, नांदेड जिल्हासह लातूर जिल्ह्यातील हजारो श्रोत्यांनी या संगीत महोत्सवाचा लाभ घेतला. 
       संगीत महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा, सचिव डॉ. रविराज पोरे, प्रा.शशिकांत देशमुख, डॉ. संदिपान जगदाळे, प्रा. हरिसर्वोत्तम जोशी, दिनकर पाटील, विनायक राठोड, शिरीष कुलकर्णी ,निलेश पाठक,  शांभवी देशपांडे, देवदत्त कुलकर्णी, महेश काकनाळे यांनी परिश्रम घेतले
वैभव कुलकर्णी यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.

Post a Comment

أحدث أقدم