ईश्वराच्या आराधनेने जीवनात सर्वोच्च सुखाची प्राप्ती होते : पाथरीकर महाराज

ईश्वराच्या आराधनेने जीवनात सर्वोच्च 
सुखाची प्राप्ती होते :   पाथरीकर महाराज
लातूर : ईश्वराच्या आराधनेने मानवी जीवनात सर्वोच्च सुखाची प्राप्ती होते. त्यासाठी प्रत्येकाने  आपल्या कामाच्या धबडग्यातून ईश्वराच्या भक्तीसाठी वेळात वेळ काढणे अत्यंत आवश्यक आहे,असे प्रतिपादन प. पू. काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर यांनी केले. 
प.पू. वसुंधरारत्न डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज सत्संग मंडळाच्या वतीने  लातुरात आयोजित करण्यात आलेल्या  ८६ व्या भव्य सत्संग सोहळ्यात उपस्थित भाविक भक्तांना  पाथरीकर महाराज मार्गदर्शन करीत होते. 
प.पू. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या कृपाशिर्वादाने संपन्न होणाऱ्या या सत्संग सोहळ्याच्या संयोजक सौ. लताताई मुद्दे ह्या होत्या. तर  आयोजक श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष तथा  बोधे नगरच्या बसव  ग्रुपचे अध्यक्ष शिवलिंग वैजनाथअप्पा जेवळे   हे  होते.  हा  सत्संग सोहळा   महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक  सभागृहात पार पडला. आपल्या आशिर्वचनात पाथरीकर महाराज पुढे म्हणाले की, परमरहस्य या श्रेष्ठ ग्रंथाची रचना संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांनी केली. मात्र त्याचा प्रसार , प्रचार संतांनी केला हे सर्वज्ञात आहे. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे याबाबतीतील योगदान खूप मोठे आहे, हे कोणालाही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही,असे नमूद करून पाथरीकर महाराज म्हणाले की, आज मनुष्य जीवन अत्यंत धकाधकीचे झाले आहे. अशावेळी विश्वास ठेवावा तरी कोणावर ? असा प्रश्न प्रत्येकास पडताना दिसतो. तेव्हा आजघडीला केवळ संतांवर विश्वास ठेवावा. संताशिवाय अन्य कोणीही विश्वास ठेवण्याइतपत विश्वासपात्र असूच शकत नाहीत. चांगल्या दृष्टीसाठी  ज्ञानाचे काजल डोळ्याला लावले पाहिजे. जेव्हापासून डोळ्याला चांगले ज्ञान देणारे काजळ लावणे बंद झाले आहे, तेव्हापासून लोकांना चष्म्याचा आधार घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. 
मानवी जीवनात ज्ञानाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. ज्ञानाशिवाय मनुष्य जीवनाला काहीच अर्थ राहत नाही. त्यासाठी प्रत्येकाने मिळेल त्या पद्धतीने ज्ञानार्जन करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.माणूस जसे कर्म करतो, तसे फळ त्याला मिळत असते. त्यासाठी प्रत्येकाने नेहमी आपले कर्म चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  जीवनात तीर्थ यात्रेलाही खूप महत्व आहे. परंतु यात्रा करत असताना मनात कसल्याही प्रकारचा स्वार्थ, वाईट विचार आल्यास यात्रा फलदायी होत नाही. त्यासाठी ८४ लाख योनीनंतर  प्राप्त होणाऱ्या मानव जीवनाच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहण्याचे आवाहनही पाथरीकर महाराजांनी  यावेळी बोलताना केले. यावेळी त्यांना गायक - वादक राजकुमार वाघमारे यांनी उत्कृष्ट साथ दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी   संयोजक सौ. लताताई मुद्दे, आयोजक  शिवलिंग वैजनाथअप्पा जेवळे  यांसह  अनेकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم