बाईपण भारी देवा

बाईपण भारी देवा

      स्त्री म्हणजे ईश्वराने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती होय. तिच्यामध्ये कुटुंबाला एकत्र बाधण्याचं कौशल्य असतं. तिच्यामध्ये असलेले उत्तम गुण म्हणजे संवेदनशीलता आणि सहनशीलता . या गुणांमुळेच तर ती कोणत्याही परिस्थितीत जगण्याला सामोरं जाते. प्रत्येक स्त्रीकडे तिची एक उत्तम कला असते. तिचं एक स्वतंत्र अस्तित्व असतं. एकातरी क्षेत्रात ती पारंगत असतेच असते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे लहान असतानाच तीच्यातील कलागुण दिसायला लागतात. पण एकदा का तिचं लग्न झालं अन् ती सासरी गेली की तिला तिच्या अस्तित्वाचा विसर पडतो. रांधा वाढा उष्टी काढा यातच ती स्वतःला झोकून देते. नवरा ,लेकरं , सासू, सासरे व नातलग यांचं करता करता तीला एक स्वतंत्र अस्तित्व आहे हे ती विसरूनच जाते. पत्नी, आई, सून , सासू या भूमिका पेलता पेलता तिला आपल्या वलयाचं विस्मरण होतं. ती सर्वांचं सर्व करण्यातच स्वतःला गुरफटून घेते. बाहेरच्या विश्वाशी तिचं देणंघेणं नसतं. संसाराच्या रहाटगाडग्यात रहाणचं ती पसंद करते. स्वतःचं मन मारून इतरांसाठीच जगण्यात ती धन्यता मानते. कुटूंबाच्या प्रगतीत तिचा वाटा खूप मोलाचा असतो हे तिला माहीतच नसतं कारण याबद्दल तिचं कधी कोणी कौतुकच केलेलं नसतं. तिच्याकडे उत्तम निर्णयक्षमता असते. कठिण प्रसंगी ती ठामपणे उभी राहते. घराचा भक्कम पायाच ती असते . कुटूंबावर आलेल्या संकटांशी ती दोन हात करते. संस्कार आणि संस्कृती जपण्याची उत्तम कला तिला अवगत असते. तिच्यामुळेच तर सासर व माहेरच्या घराचं घरपण टिकून राहतं. जबाबदारीच्या धाग्यात ती एवढं स्वतःला विणून घेते की परत येण्याचे संकेतच माहीत नसतात . धागे उसवण्याची भिती मात्र कायम मनात असते. त्यामुळे तिला हे वलय ही चौकट पार करण्याचं धाडस होत नाही. बाईपणाच्या या चौकटीतच ती स्वतःचं समाधान शोधत असते. 

स्त्री म्हणजे घराचं घरपण
स्त्री म्हणजे हसरं अंगण
स्त्री म्हणजे नाविन्याचं नवेपण 
स्त्री म्हणजे झिजणारं सुगंधी चंदन

इतरांसाठी झिजणं हेच तिला माहीत असतं .तिच्यातील कौशल्याचा कलागुणांच्या अस्तित्वाचा तिला विसर पडतो. 
         पण..... पण तिचे हे अस्तित्व तिला परत मिळवून देणारी, तिच्या भावना जागृत करणारी, तिच्या कलागुणांची पारख करून त्यांना वाट मोकळी करून देणारी, तिच्यातील स्त्री सामर्थ्याची जाणीव करून देणारी, संसाराच्या वलयातून बाहेरच्या जगात पाहण्याची सुंदर दृष्टी निर्माण करून देणारी, बाईपणाच्या चौकटीबाहेरची दुनिया पाहण्याचे स्वप्न दाखवणारी, तुझ्यात आकाश पेलण्याचं सामर्थ्य आहे तु हे करू शकतेस... तु करून दाखव... अशी सकारात्मक उर्जा तिच्यात ओतप्रोत भरणारी, वयाचं बंधन झुगारून स्वच्छंदीपणे जगण्याची प्रेरणा देणारी.... तिच्यातील बळाला हिंमत देणारी ...एखादी बहिण किंवा मैत्रिण असेल तर कोणत्याही वयात ती मंगळागौर स्पर्धा काय कोणतेही स्टेज ती सहजपणे गाजवेल. तिला उतरत्या वयात डॉक्टरांची गरज सुद्धा भासणार नाही. असा हा नात्यांचा सुंदर प्रवास म्हणजे बाईपण भारी देवा 
        सर्व वयातील स्त्रियांनी पहावा असा हा मराठी चित्रपट आहे बाईपण भारी देवा दिग्दर्शक केदार शिंदे लेखिका वैशाली नाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही कलाकृती होय. त्यातील चाळीशी पार केलेल्या सहा बहिणींनी आपले पात्र अतिशय उत्तमपणे साकारले आहे. बहिणी बहिणीचे भांडण ,रुसवे , फुगवे यावर मात करून वयाचं बंधन झुगारून सहा बहिणी जेव्हा एकत्र येऊन स्टेज गाजवतात तेव्हा म्हणावं वाटतं बाईपण खरंच भारी आहे देवा. 
         पडद्यावर सुरुवातीला १९७८ असं लिहीलेलं वाचलं आणि मला ही माझीच कहाणी वाटली. वयाची चाळीसी पार केलेल्या आणि नुकत्याच चाळीसीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या आम्ही मैत्रिणी वैशाली, शुभांगी, सुरेखा , अपर्णा आणि मी आज खूप दिवसांनी फुल टू धम्माल करत चित्रपटाचा मनसोक्त आनंद लुटला. आमुचे चिमुकलेही आईच्या चेहऱ्यावर चा आनंद पाहून खूश झाले .बाईपणाचा असाही सोहळा साजरा करता येतो याचा आनंद प्रत्येकीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. खरंच आजचा दिवस आम्हा सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरला.
          स्त्रीमनाचा आरसा असणारा, स्त्रीयांच्या अंतरंगातील शक्तीचे दर्शन घडवणारा हा सिनेमा आम्हीतर पाहिला परंतू तुम्ही सुद्धा पहायला विसरू नका. हा चित्रपट प्रत्येक स्री ने पहावा असाच आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या कुटुंबासोबत, आपल्या मैत्रिणीसोबत जवळचे सिनेमागृह गाठा आणि बाईपण भारी देवाचा आनंद प्रत्येक स्रीने लुटायलाच हवा. दिग्दर्शक केदार शिंदे यांचे खूप खूप धन्यवाद कारण बाईपणाचा असा ही सोहळा साजरा करता येतो हे आम्ही यातून शिकलो.
           मग जाणार ना सिनेमा पहायला नक्की जा आणि तुमचेही अनुभव शेअर करायला विसरू नका.

खुणावती तुज दाही दिशा बहरतील स्वप्ने फुलतील आशा 
रडत कुढत नको बसू तू 
बाईपणाचा कर सोहळा तू
दाखव तुझे कर्तृत्व हे नारी
देवा बाईपण खरंच आहे भारी

लेखिका
सौ.तनुजा रुपचंद ख्याडे
मुरुम , जि धाराशिव
भ्रमणध्वनी--7769040555

Post a Comment

أحدث أقدم