झालर क्षेत्रातील नियमबाह्य कर वसूलीतून शासनाची फसवणूककासारगावमध्ये 20 वर्षात कोट्यावधींचा महसूल घोटाळा -ॲड.नारायण नागरगोजे


झालर क्षेत्रातील नियमबाह्य कर वसूलीतून शासनाची फसवणूक
कासारगावमध्ये 20 वर्षात कोट्यावधींचा महसूल घोटाळा -ॲड.नारायण नागरगोजे 
लातूर ः लातूर शहरालगत असलेल्या कासारगाव ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीबाहेरच्या झालर क्षेत्रात कारभारीय हस्तक्षेप करत बांधकाम परवाने, 8 अ, विविध घरपट्टी, पाणीपट्टी यासह विविध कर वसुली बेकायदेशिररित्या करून तो पैसा शासनाकडे जमा केला नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. सन 2000 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत असलेल्या संबंधीत ग्रामसेवकांने
 महसुलाचा हा पैसा वसुल करून संबंधीत रहिवाशी, वरिष्ठ अधिकारी व शासनाची दिशाभूल तर केलीच, शिवाय हा वसुल पैसा शासन दप्तरी जमा केलाच नाही, हे उघड झाले आहे. कोट्यावधी रूपयांच्या या महसुल घोटाळा प्रकरणातील सर्व संबंधितांची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जनआवाज फाऊंडेशनने जिल्हा परिषदेकडे केली आहे.
लातूर शहरालगत कासारगाव ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीअंतर्गत यशवंत नगर, काशिलिंगेश्‍वर नगर, सोहम कॉलनी, बनसोडे नगर, सिध्दीविनायक नगर व इतर मोठा परिसर कासारगाव शिवारात होता. मात्र या क्षेत्राला झालर क्षेत्र म्हटले जायचे त्यामुळे कासार गाव ग्रामपंचायतीला केवळ 8 अ नोंदणीसाठी तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. मात्र ग्रामपंचायतीच्या संबंधीत ग्रामसेवकांनी सन 2005 पासून 2021 पर्यंत 8 अ नोंदणी तर केलीच, त्याचा गैरफायदा घेत बेकायदा बांधकाम परवाने दिले व विविध प्रकारचे करही वसुल केले. याच मुद्यावरून जिल्हा परिषदेकडे या गैरव्यवहाराच्या तक्रारी गेल्यानंतर तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी 2013 मध्ये लातूरच्या गटविकास अधिकार्‍यांना पत्र लिहून कासारगाव ग्रामपंचायतीला हद्दीबाहेरील क्षेत्रामध्ये असलेले भुखंड नोंदविता येणार नाहीत, ना हरकत प्रमाणपत्र देता येणार नाहीत, विविध कामांचा निधी ग्रामपंचायतीमार्फत खर्च करणे, बांधकाम परवाने देणे आदि कामे करता येणार नाहीत. व ती ग्रामपंचायतीने करू नयेत, याबाबत आपल्या स्तरावरून ग्रामपंचायतीस सुचना द्याव्या असे स्पष्ट बजावले होते. तरीही त्यानंतर कासारगावच्या ग्रामपंचायतीने बेकायदा नोंदी घेतल्या, करवसुली केल्या. मात्र या वसुलीचा कोणताही मागमुस मागे ठेवला नाही. शिवाय या महसुल वसुलीचा पैसा वरिष्ठ शासकीय कार्यालयाकडे जमाही केला नाही. त्यामुळे या सर्व कामांना जबाबदार असणार्‍या सन 2000 ते 2021 या कालावधीतील संबंधीत ग्रामसेवकांच्या तसेच ग्रामपंचायतीच्या कारभाराची व दप्तराची तपासणी व चौकशी करावी, तसेच चौकशी सुनावणी आपल्या उपस्थितीत घ्यावी अशी मागणी जनआवाज फाऊंडेशनचे संस्थापक अ‍ॅड.नारायण पी.नागरगोजे व अरविंद कापसे यांनी केली आहे.
....अन्यथा न्यायालयात दाद मागू
याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे अनेकदा तक्रारी करूनही आजपर्यंत या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करणार्‍या सर्व संबंधितांची चौकशी करावी. कासारगाव झालर क्षेत्रातील सर्व मालमत्तांच्या नोंदी नियमीत कराव्यात अशी मागणी नागरगोजे यांनी या पत्रकार परिषदेत केली आहे. या प्रकरणाची चौकशी व मालमत्तांच्या नोंदी नियमीत न केल्यास तसेच तत्कालीन महसुल आर्थिक गैरव्यवहारातील ग्रामसेवक श्रीमती इरे मॅडम (कालावधी - 20/10/2005 दते 27/2/2007), श्री बनकर (3/4/2010 ते 11/03/2011), हुसेन शेख (26/11/2011 ते 31/03/2016), अनंत सुर्यवंशी (03/04/2019 ते 2020) श्री मोरे (01/04/2020 ते 11/09/2020) आणि उत्तम गोमसाळे (2020-21) यांच्या कारभाराची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करून दोषींना बडतर्फ करावे अन्यथा आपण न्यायालयात धाव घेवू असा इशाराही अ‍ॅड.नारायण नागरगोजे, अरविंद कापसे यांनी दिला आहे.

Post a Comment

أحدث أقدم