शिक्षक प्रशिक्षणाचा "अभिनव" उपक्रम

शिक्षक प्रशिक्षणाचा "अभिनव" उपक्रम
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांचे प्रशिक्षण आवश्यक असते. यातून शिक्षकांमध्ये नवनवीन कौशल्य विकसित होतात. अनेक वेळा शिक्षक प्रशिक्षणाचा कार्यक्रम क्लिष्ट होऊन जातो मात्र आमच्या शाळेत हाच उपक्रम अगदी खेळीमेळीच्या वातावरणात अभिनव पद्धतीने राबविला जातो. याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत. लातूर शहरातील श्री किशन सोमाणी विद्यालय या शाळेत मी गेल्या तीन वर्षांपासून विज्ञान अध्यापनाचे कार्य करतो. हे प्रशिक्षण दैनंदिन असल्यामुळे जणू शिक्षकांची शाळाच रोज भरते असे आम्हाला वाटते. म्हणून बऱ्याचदा गमतीने आम्ही श्री किशन सोमाणी विद्यालय- शिक्षकालय असे म्हणतो !! सकाळी साडे सात ते एक वाजेपर्यंत मुलांची शाळा सुरू असते, आणि पुढचे 40 ते 50 मिनिटे शिक्षकांची! आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे नियोजन शालेय प्रशासनाने केले आहे. शालेय प्रशासन म्हणजे मुख्याध्यापक व तीन पर्यवेक्षक आहेत. त्याशिवाय विषय शिक्षक जास्त असल्यामुळे प्रत्येक विषयाला एक विषय प्रमुख नेमलेला आहे. 
1. सोमवार ( आदर्श पाठ) -आठवड्याची सुरुवात ही आदर्श पाठाने होते. विषयानुसार सर्व शिक्षकांना वर्ग खोल्यांचे वाटप केलेले असते. उदाहरणार्थ विज्ञान शिक्षक वर्ग खोली क्रमांक 23 गणित शिक्षक वर्ग खोली क्रमांक 24 या पद्धतीने. एका खोलीत सहा सात शिक्षक आणि एक विषय प्रमुख बसलेले असतात. त्यांच्या मधून अगदी क्रमाने प्रत्येक शिक्षकाला दर सोमवारी एक घटक शिकवायचा असतो. बाकी शिक्षक समोर बसलेले असतात व पाठ झाल्यानंतर आवश्यक असेल तर त्यात सुधारणा सांगतात. 
2. मंगळवार (विषय शिक्षक संवाद)-मंगळवारी देखील सोमवार प्रमाणे विशेष शिक्षक ठरवून दिलेल्या वर्ग खोल्यांमध्ये बसतात व आपल्या विषयांशी निगडित घटकांवर चर्चा करतात. 
ई लर्निंग, गृहपाठ, अभ्यासक्रम पूर्तता, पुढील आठवड्यातील अभ्यासक्रमाचे नियोजन, उपक्रम, संदर्भ साहित्य इत्यादी गोष्टींवर चर्चा होतात. उस्फूर्त आलेले विषय सुद्धा असतात.
3. बुधवार (वर्गशिक्षक संवाद)- बुधवारी सर्व तुकड्यांचे वर्गशिक्षक एकत्र जमतात. उदाहरणार्थ सातवीचे वर्गशिक्षक हॉल क्रमांक 22 आठवीचे वर्गशिक्षक हॉल क्रमांक 23 याप्रमाणे.
वर्ग शिक्षकांच्या बैठकीमध्ये आठवड्यातील उपस्थिती, प्रशासनाकडून आलेले विषय, पालकांकडून आलेले विषय, त्याचप्रमाणे आठवड्यात होणारे विद्यालयातील कार्यक्रम, उपक्रम, दैनिक परिपाठ, वर्गातील शिस्त, शालेय गणवेश, इत्यादी विषयांवर चर्चा होते. 
4. गुरुवार (व्हिडिओ)-या दिवशी शाळेतील सर्व वर्गांचे, विषयांचे शिक्षक सभागृहात एकत्र जमतात. शाळेचे सुसज्ज व प्रशस्त असे कस्तुर-कांचन सभागृह आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ञ विचारवंत यांच्या मुलाखती ,मार्गदर्शन, आणि भाषणाचे व्हिडिओज आम्हीं पाहतो. त्याशिवाय शाळेतील शिक्षक ऑनलाईन पद्धतीने विषय तज्ञांच्या किंवा मार्गदर्शक व्यक्तींच्या मुलाखती घेतात. 
5. शुक्रवार (पुस्तक वाचन)-विद्यालयातील शिक्षक विविध पुस्तकांचे वाचन करीत असतात व त्यामधील आशय किंवा त्या पुस्तकाचा सारांश दर शुक्रवारी एक शिक्षक सर्व शिक्षकांना सांगत असतो. 
शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक पुस्तकांवर दर शुक्रवारी चर्चा होते. यातून अनेक नव्या लेखकांचा, पुस्तकांचा व विचारांचा परिचय शिक्षकांना होतो. 
6. शनिवार (पालक संवाद)-शनिवारचा दिवस पालकांसाठी राखीव असतो या दिवशी शाळा सुटल्यानंतर पालक शिक्षकांशी संवाद करतात. सर्व शिक्षक शाळेच्या तळमजल्यावर असलेल्या प्रार्थना सभागृहामध्ये उपस्थित असतात. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी किंवा त्यांच्याशी निगडित काही विषय पालक सांगतात. शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यांविषयी आवश्यक असणाऱ्या सुधारणा त्याच्या पालकांना सांगतात यातून पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये एक चांगला सुसंवाद होतो आणि विद्यार्थ्यांवर अधिक गांभीर्याने दोघेही लक्ष देतात.
आठवड्याचे सहा दिवस सहा प्रकारचे उपक्रम शाळेत सुरू असतात. दररोज शाळेचे मुख्याध्यापक व तीनही पर्यवेक्षक यात सहभागी असतात वेळोवेळी मार्गदर्शन करतात सूचना करतात. आणि माझ्यासारख्या नवोदित शिक्षकाला प्रोत्साहित सुद्धा करतात. 
आमच्या संस्थेचे मार्गदर्शक जेष्ठ पर्यावरण तज्ञ व पत्रकार अतुल देऊळगावकर यांच्याशी संवाद म्हणजे मेजवानीच!
अगदी जगभर शिक्षण क्षेत्रात कोणकोणते प्रयोग सुरू आहेत याविषयी त्यांच्याकडून माहिती मिळते. फिनलंड देशातील शिक्षण पद्धतीवर ते भरभरून बोलतात. 

  शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत स्वामी व पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी यांचे अतिशय सूक्ष्म नियोजन असते
1. मध्यांतर (मधली सुट्टी)-शिक्षकांना मध्यंतरामध्ये विद्यार्थ्यांसोबतच डबा खायचा असतो. यातून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये अनौपचारिक गप्पा होतात. त्याचबरोबर विद्यार्थी डब्यामध्ये जंक फूड, चिप्स, चॉकलेट आणणार नाहीत याची काळजी घेतली जाते. आठवड्यातून एका दिवशी संबंधित वर्गाचे वर्गशिक्षक आपल्या वर्गामध्ये जातात विद्यार्थ्यांसोबत डबा खातात. त्याचे नियोजन पुढीप्रमाणे -सोमवार 5वी,मंगळवार 6वी,बुधवार 7वी,गुरुवार 8वी,शुक्रवार 9वी,शनिवार 10वी ,2-शाळा सुटल्यानंतर
शाळा सुटल्यानंतर एकाच वेळी हजारो विद्यार्थी शाळेतून बाहेर पडत असतात म्हणून विद्यार्थी शिस्तीसाठी आठवड्यातून दोन दिवस प्रत्येक शिक्षकाला ठराविक जागा नेमून दिलेले आहेत त्या ठिकाणी ते उभे असतात. प्रत्येक वर्गसमोर, पायऱ्यांवर, गेट समोर, पार्किंग जवळ, ई.अशा अभिनव उपक्रमांमुळे आणि सूक्ष्म नियोजनामुळे शाळेचा गुणवत्तापूर्ण निकाल दरवर्षी चढता राहिलेला आहे. 

दर्शन राजकुमार देशपांडे
सहशिक्षक विज्ञान विभाग
श्री किशन सोमाणी विद्यालय, लातूर

Post a Comment

أحدث أقدم