बालेवाडीच्या धर्तीवर उदगीर शहरात क्रीडा संकुल उभारणार
-क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
लातूर : आपल्या ग्रामीण भागात व्हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी, क्रिकेट या खेळासह अनेक खेळांमध्ये राज्य ते देशपातळीपर्यंत आपले खेळाडू खेळ खेळत असून त्यांना पाठबळ देण्यासाठी उदगीर येथे बालेवाडीच्या धर्तीवर क्रीडा संकुल उभारणार असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थान बांधकामाचा भव्य भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मन्मथ किडे, अर्जुन आगलावे, प्रा. प्रवीण भोळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समीर शेख, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, श्याम डावळे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, नवनाथ गायकवाड, बाळासाहेब मरलापल्ले, गटविकास अधिकारी सुरडकर यांच्यासह अधिकारी आणि विविध संघटना आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या भागात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था नसल्याने कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून त्यांच्यासाठी आज आपण तहसील कार्यालयाच्या पाठीमागे निवासस्थानाचे बांधकाम करत असल्याचे सांगून भविष्यात या भागात नोकरी करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधेने पुरेपूर असणारी इमारत उभी राहील आणि त्यात या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे कुटुंब सुखी राहतील यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी सांगितले. या इमारतीसाठी जवळपास
४ कोटी ७८ लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला असून सदर इमारत १ वर्षात पूर्ण होणार आहे.तसेच आपल्या शहराचा विकास करण्यासाठी आता शासन पाठीशी आहे. उदगीर शहरात पुढील ८ दिवसात अंडर ग्राऊंड ड्रेनेजचा प्रस्ताव तयार करुन तो शासन दरबारी मंजुरीसाठी पाठवण्याच्या सूचना क्रीडा मंत्र्यांनी यावेळी दिल्या.
खेळाडुसाठी पुण्याला आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ मंजूर केले तर औरंगाबाद ( संभाजीनगर) येथे क्रीडापीठ मंजूर केल्याची माहितीही श्री. बनसोडे यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील यांनी केले. सुत्रसंचलन प्रा.मदन पाटील यांनी केले.
إرسال تعليق