१७ सोसायट्यांत मिळणार जेनेरिक औषधी

 १७ सोसायट्यांत मिळणार जेनेरिक औषधी

लातूर : प्रतिनिधी-गावागावांतील विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये (सेवा सोसायट्या) बँकिंग सुविधेसह जेनेरिक औषध दुकाने व अन्य १५९ प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा व्यवसाय करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यातून लातूर जिल्ह्यातील १७ सोसायट्यांनी जेनेरिक औषध दुकाने सुरु करण्याची तयारी दर्शवली असून, यासंबंधी लागणागणा-या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरु आहे.

राज्यातील गावपातळीवर २१ हजारांवर तर लातूर जिल्ह्यात ५८५ विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमार्फत शेतीसाठी पतपुरवठा करणे, बी-बियाणे विक्री केंद्र सुरू करणे, पेट्रोल पंप सुरु करणे, अडत दुकान, कापड दुकान यासह ३१ प्रकारचे व्यवसाय सुरु करता येत होते. यामध्ये केंद्र सरकारने जेनेरिक औषध दुकान सुरू करणे, रोपवाटिका, वजनकाटा सुरु करणे, सोने तारण, वाहन तारण, गृह कर्ज योजना, ठेवीवर कर्ज देणे अशा नव्या व्यवसायांची भर घातली आहे. आता हे व्यवसाय वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने सेवा सोसायट्यांना करता येणार आहेत. त्यासाठी पोटनियमात दुरुस्ती करावी लागणार आहे.

हे करता येणार व्यवसाय
कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी कर्ज, ग्रामीण बिगरशेती क्षेत्रातील नवीन उपक्रमांना कर्ज व वैयक्तिक कर्ज, बचत गटांना कर्ज, सोने तारण कर्ज सुविधा, वाहन तारण, गृह कर्ज आणि ठेव तारण कर्ज, बँकिंग सुविधा, लहान आणि छोटा व्यवसाय सुरु करणे, सुरक्षारक्षक नियुक्त करणे, शेती आणि शेतक-यांशी निगडित व्यवसाय सुरु करता येणार आहेत. शेतीमाल आणि त्याची प्रतवारी, कृषी ई-सेवा, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी आणि विक्री, शेतीमालाचा लिलाव केंद्र, ऑईल मिल, पिकांसाठी साठवण गोदाम, मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया करणे, दूध संकलन सुरु करणे, फलोत्पादनासाठी रोपवाटिका तयार करणे आणि रोप विक्री करणे, जेनेरिक औषध दुकाने सुरु करणे, कृषी बियाणे, खते, औषधे (निविष्ठा विक्री), कीटकनाशके, पशुखाद्य विक्री करणे, कृषी सेवा केंद्र सुरू करणे, कृषी उपकरणे विक्री करणे, ठिबक सिंचन योजनेचा आराखडा तयार करणे. त्यासाठीचे स्प्रिंकलर सेवा युनिट सुरु करणे, पीव्हीसी पाईप्स विक्री, अशा व्यवसायांचा समावेश आहे.

या गावच्या आहेत त्या १७ सोसायट्या
लातूर जिल्ह्यातील जेनेरिक औषध दुकाने सुरू करण्याची तयारी दर्शवणारी लातूर तालुक्यातील शिराळा, मुरुड, बोरी, तांदुळजा रेणापूर तालुक्यातील पानगांव व खरोळा चाकूर तालुक्यातील चाकूर औसा तालुक्यातील मातोळा उदगीर तालुक्यातील हेर, देर्वजन, वाढवणा बु, व हंडरगुळी निलंगा तालुकयातील लांबोटा, मदनसुरी अहमदपूर तालुक्यातील खंडाळी, रोकडासावरगांव शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ या गावच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आहेत.

Post a Comment

أحدث أقدم