राज्य मंत्रीमंडळाला लातूर जिल्ह्याचा विसर- माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख

 राज्य मंत्रीमंडळाला लातूर जिल्ह्याचा विसर -माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख



लातूर (प्रतिनिधी) -मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मोठा गाजावाजा करून छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतून या विभागाची निराशाच झाली आहे, शासनाने जुन्या योजनाच नव्याने जाहीर करून येथील जनतेची दिशाभूल केली आहे. या विभागात लातूर जिल्हा आहे.याचा तर सरकारला विसरच पडला आहे, अशी प्रतिक्रीया राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भाने प्रतिक्रीया व्यक्त करतांना माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे की, बऱ्याच अवकाशानंतर मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी, शिक्षण, औद्योगिकीकरण, सार्वजनिक बांधकाम,आरोग्य या विभागांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन येथील अनुशेष दूर होईल ही अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली आहे.सततच्या दुष्काळामुळे लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील कृषी क्षेत्राबरोबरच औद्योगिक प्रगती थंडावली आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यात पाणी आणण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणे अपेक्षित होते मात्र मराठवाडा वॉटरग्रीडचा चेंडू पुन्हा केंद्राकडे ढकलून राज्य शासनाने हात झटकले आहेत.
लातूरच्या शैक्षणिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक व पूरक सुविधांची उभारणी, लातूर शहराचा बाह्य वळण रस्ता,एमआयडीसीचा तिसऱ्या टप्प्यातील विस्तार, अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत यासंबंधीच्य घोषणा मंत्रिमंडळ बैठकीनंतर केल्या जातील असे वाटत होते मात्र राज्य सरकारने फक्त मराठवाड्यात येऊन बैठक घेण्याचे सोपस्कार पूर्ण केले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे बैठक होऊनही मराठवाडा विभागाला विशेष असे काही द्यायचचे नव्हते तर ही बैठक घेतली कशासाठी ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे
असेही आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.

Post a Comment

أحدث أقدم