पावसाअभावी शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम धोक्यात; पालकमंत्र्यांनी दिले प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश

पावसाअभावी  शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम धोक्यात; पालकमंत्र्यांनी दिले प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश

 लातूर-लातूर जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने जिल्ह्यातील पिकं धोक्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाने याबाबत तात्काळ पंचनाम्याची कार्यवाही करावी, असे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासोबतच, पिण्याच्या पाण्याचेही योग्य नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री श्री. महाजन यांनी दिले आहेत. या अनुषंगाने शासन स्तरावरून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. पिक विम्यासंदर्भात उचित कारवाई लवकरात लवकर करण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. पाऊस लांबला असल्यामुळे टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन कृषि विभाग, महसूल विभाग व संलग्न सर्व विभागांनी उपाययोजनांचे योग्य नियोजन करावे. यात दिरंगाई होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिल्या आहेत.

खरीप हंगाम 2023 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची 25 टक्के आगाऊ (अग्रिम) रक्कम देण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही गतीने करावी, अशी सूचना पालकमंत्री यांच्याकडून देण्यात आली.
लातूर शहराला मांजरा धरणातून पिण्याचे पाणी पुरविले जाते. या धरणाची पाणीपातळी 24 टक्केपेक्षाही खाली गेली आहे. या गोष्टीचे गांभीर्य ओळखून पाणी पुरवठा केला जातो आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील पाणीसाठा राखीव ठेवण्यासंदर्भात जिल्ह्याधिकारी यांनी आदेश काढले आहेत. पाटबंधारे विभागाच्या यंत्रणांनी याचे काटेकोर पालन करावे, तसेच कोठेही पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार नाही, यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم