दुर्मिळ छायाचित्रे, ग्रंथांमुळे मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहचण्यास मदत -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 दुर्मिळ छायाचित्रे, ग्रंथांमुळे मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहचण्यास मदत -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे


·        जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनाचे उद्घाटन

·        मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन

लातूर : मराठवाडा मुक्तिसंग्रामातील दुर्मिळ छायाचित्रे, तत्कालीन वृत्तपत्रांतील बातम्या आणि ग्रंथांमुळे मुक्तिसंग्रामाचा जाज्वल्य इतिहास युवा पिढीपर्यंत पोहचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळसंगीता टकलेजिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका कांबळेनगरपालिका प्रशासनचे सहायक आयुक्त रामदास कोकरे, इतिहास संशोधक डॉ. सुनील पुरी आणि भाऊसाहेब उमाटे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच येथील ग्रंथांची माहिती घेतली.

प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या दुर्मिळ छायाचित्रांवरून आणि तत्कालीन वृत्तपात्रांच्या बातम्यांमधून मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा संघर्ष किती कठीण होता, याविषयी माहिती मिळते. तसेच मुक्तिसंग्रामातील विविध घटना, लढे याविषयीची माहिती, तसेच या लढ्यातील प्रमुख व्यक्तींची सविस्तर माहिती सचित्र स्वरुपात असल्याने युवा वर्ग, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त ठरेल, असे जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे म्हणाल्या.

मराठवाडा मुक्तिसंग्रमाशी संबंधित अनेक दुर्मिळ दस्तावेज प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. या माध्यमातून मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास जाणून घेण्याची संधी युवा पिढीला मिळाली आहे. त्यामुळे या प्रदर्शनाला भेट देवून मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास समजून घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सागर यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम हा लोकलढा होता. या लढ्याची माहिती सचित्र स्वरुपात पाहण्याची संधी ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनामुळे मिळणार असल्याची अपर पोलीस अधीक्षक श्री. देवरे यांनी सांगितले.

प्रारंभी उपजिल्हाधिकारी श्री. महाडिक यांनी ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शन आयोजनाची भूमिका विषद केली. युवा पिढीला मराठवाडा मुक्तिसंग्रामाची माहिती मिळावी, यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रदर्शनाच्या ग्रंथ व छायाचित्रे संकलनासाठी इतिहास संशोधक डॉ. सुनील पुरी आणि भाऊसाहेब उमाटे यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रदर्शनाला अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांनीही भेट दिली.

15 ते 17 सप्टेंबर दरम्यान हुतात्मा स्मारक येथे ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शन

            मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत ‘अमृत महोत्सव सप्ताह’ आयोजत करण्यात आला असून या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. 15 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2023 या कालावधीत हे प्रदर्शन हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात येणार आहे. यामाध्यमातून मराठवाडा मुक्तिसंग्रामातील दुर्मिळ छायाचित्रे, तत्कालीन वृत्तपत्रे, शासकीय पत्रव्यवहार आणि या मुक्तिसंग्रामावर आधारित ग्रंथसंपदा पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم