सरकारच्या GR मध्ये दुरुस्ती झाल्यावरच पाणी पिणार, आमरण उपोषण सुरू राहणार; मनोज जरांगे यांचा निर्धार

सरकारच्या GR मध्ये दुरुस्ती झाल्यावरच पाणी पिणार, आमरण उपोषण सुरू राहणार; मनोज जरांगे यांचा निर्धार

राज्य सरकारने जीआरमध्ये दुरुस्ती केल्यावरच पाणी पिणार. त्यात काही एक-दोन किरकोळ दुरुस्त्या बाकी आहेत. मात्र, तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. सरकारचा निरोप घेऊन आमदार अर्जुन खोतकर यांनी बंद लिफाफ्यातून सरकारचा जीआर जरांगे यांना दिला. मात्र, त्यातूनही गेल्या 12 दिवसांपासून आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे सुरू असलेले हे उपोषण आज तरी सुटू शकले नाही.

दुसरीकडे जरांगे-पाटील यांंच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला वेळ हवा आहे. तो त्यांनी द्यावा, अशी मागणी यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी केली. त्यावर जरांगे यांनी काय वेळ घ्यायचा तो घ्या, मात्र आमच्या मागण्या मान्य करा, असे उत्तर दिले. जाणून घेऊ मराठा आरक्षण आंदोलनाच्या घडामोडी…

– सरकारच्या जीआरमध्ये किरकोळ दुरुस्ती राहिली आहे. त्यांना वेळ देऊ. ही दुरुस्ती होईल. महाराष्ट्राला न्याय मिळेल, मनोज जरांगे यांचा आशावाद.

– मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी अजून काही अवधी लागेल. तो त्यांनी द्यावा, अर्जुन खोतकर यांची मागणी.


– माझ्या शब्दापुढे जाऊ नका. शांततेत आंदोलन करा. आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, जरांगे पाटील यांचा निर्धार.


– द्वेष करायचा नाही. चर्चेशिवाय आपल्याला पर्याय नाही. मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

– मराठा आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे अजून मागे घेतले नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली नाही. – मनोज जरांगे

– 2004 च्या जीआरचा आम्हाला काही फायदा झाला नाही. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी आमची मागणी. – मनोज जरांगे

– वंशावळी असलेल्यांना नको, तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली होती. – मनोज जरांगे

– आपण जीआरबाबत आपले मत कळवावे. आपला निरोप शब्दशः मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवू. अर्जुन खोतकर यांचे जरांगे पाटील यांना आवाहन.

– 2004 च्या जीआरनुसार सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत नव्हते. त्यात सरकार सुधारणा करणार. – अर्जुन खोतकर

– सरकार एक-एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सरसकट प्रमाणपत्र देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ मागितला. – अर्जुन खोतकर

– मराठा आरक्षणावर सरकारने नवा जीआर काढला. हा नवा जीआर मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे सोपवाल. – अर्जुन खोतकर

– मराठा आरक्षणावर रात्री अडीचपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि शिष्टमंडळाची चर्चा झाली. – अर्जुन खोतकर

– अर्जुन खोतकर यांनी दिलेला बंद लिफाफा जरांगे पाटील यांनी वाचला. पत्रातील मजुकराबाबत सहकाऱ्यांशी चर्चा सुरू.


– सरकारचा निरोप घेऊन आमदार अर्जुन खोतकर आंतरवाली सराटीमध्ये दाखल. ते बंद लिफाफा मनोज जरांगे पाटील यांना देणार.

– मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर मराठा आंदोलक शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे यांची भेट. चर्चेची इत्यंभूत माहिती दिली.

– जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनादरम्यान राज्य सरकार आणि आंदोलनाच्या शिष्टमंडळाची बैठक रात्री उशिरा मुंबईत पार पडली.

– मुंबईतल्या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत झालेल्या निर्णयाचा बंद लिफाफा राज्य सरकारच्या वतीने आज मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी शिष्टमंडळ आंतरवाली सराटीमध्ये जाणार आहे.

– मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज बारावा दिवस असून अद्याप राज्य शासन आणि उपोषणकर्ते यांच्यात तोडगा निघालेला नाही.

– मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला असला, तरी सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यामुळे अद्याप मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही.

– मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री आणि राज्य सरकारसोबत सविस्तर चर्चा केली. रात्री एक वाजेपर्यंत ही चर्चा चालली. त्यानंतरही या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय एका बंद लिफाफामध्ये पॅक करण्यात आला आहे. हा निर्णय आज दुपारी मनोज जरांगे यांच्याकडे देण्यात येणार आहे.

– राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा न्यायालयात टीकला पाहिजे, त्यासाठी विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसारच निर्णय घ्यावा लागणार असल्याचे, राज्य सरकारचे मत आहे. राज्य सरकारने घेतलेला निर्णय मनोज जरांगे पाटील यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील आपल्या सहकाऱ्यांची चर्चा करून आपल्या उपोषणाबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

– आंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचा आज बारावा दिवस आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर उपोषण सोडावे, अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم