आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर : देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर प्राणपणाला लावून लढणाऱ्या सैनिकांच्या, माजी सैनिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवार हा तालुका आणि विभागीय स्तरावर आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी निश्चित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित सशस्त्र ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल हेमंत अच्युत जोशी, कर्नल (नि.) प्रकश राजकर यांची यावेळी उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सशस्त्र ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ करण्यात आला.
देशाच्या संरक्षणासाठी सैनिकांकडून करण्यात येणार त्याग लक्षात घेवून समाजाने त्यांच्याप्रती आदरभाव जपणे आवश्यक आहे. सशस्त्र ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सैनिकांप्रती आपली सामाजिक बांधिलकी दाखविण्याची संधी नागरिकांना प्राप्त झाली असून सर्वांनी यामध्ये योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले.
सन 2022 मध्ये 42 लाख 35 हजार रुपये सशस्त्र ध्वजदिन निधी संकलित करून लातूर जिल्ह्याने आपले शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले होते. सन 2023 मध्ये जिल्ह्याला 42 लाख 22 लाख रुपये निधी संकलनाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) श्री. पांढरे यांनी यावेळी दिली.
वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता आणि शौर्यपदकधारक माजी सैनिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच विशेष गौरव पुरस्कारप्राप्त सैनिकांना यावेळी गौरविण्यात आले. दिवंगत जवान संभाजी केंद्रे यांच्या कुटुंबियांना यावेळी कल्याणकारी निधीतून आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच सैन्य दलात कार्यरत असताना जखमी होवून अपंगत्व आलेले हवलदार प्रशांत शिवाजी मुळे यांना शासनाकडून 17 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
सशस्त्र ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शासकीय कार्यालय प्रमुखांना यावेळी प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. सन 2022 मध्ये ध्वजदिन निधी संकलनामध्ये लातूर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सैनिक कल्याण विभागाकडून प्राप्त स्मृतिचिन्ह जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांना सुपूर्द करण्यात आले.
إرسال تعليق