लातूर दि.15 ( जिमाका ) लातूर जिल्ह्यातून जाणारे महामार्ग अत्यंत उच्च दर्जाचे झाले असून त्यामुळे रोड सेफ्टी हा विषय अत्यंत महत्वाचा झाला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये याबाबतची जागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. येणाऱ्या वर्षाचा संकल्प करू या, लातूर शहर अपघात मुक्त करु या अशी साद जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना घातली आहे.
राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह दि १५ जानेवारी २०२४ ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजित केला आहे. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित उदघाटन समारंभात जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.अजय देवरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गोतपगार,जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. प्रदीप ढेले, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,एम. एम. पाटील,विभागीय वाहतूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, संदीप पडवळ, सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, सहा प्रादेशिक परिवहन कार्यालय, गणेश कदम उपस्थित होते.
अपघातास आळा घालणे हे केवळ वाहन चालकांचे कर्तव्य नसून प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे असे सांगून आज कालच्या युवा पिढीमध्ये वाहने अतिवेगाने चालविण्याची क्रेझ असल्याने अपघातांच्या संख्येत दुर्देवाने वाढ होत असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी सांगितले. यासाठी युवा पिढीमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती होणे गरजेचे असून प्रत्येक शाळामध्ये रस्ता सुरक्षा शिकविण्याची गरजही त्यांनी यावेळी विशद केली.प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर येथे उभारण्यात आलेल्या 'रस्ता सुरक्षा गॅलरी'चे विशेष कौतूक करुन याच धर्तीवर लातूर शहरात अन्य काही ठिकाणी अशा गॅलरी उभारण्यात याव्यात अशा सूचना केल्या. अपघातला कारणीभूत ठरणारे घटक आणि रस्ता अपघात आणि सुरक्षा हा गंभीर विषय त्यांनी अतिशय मार्मिकपणे सोदाहरण देऊन पटवून दिला. लातूर जिल्ह्यात एकही अपघात होणार नाही अशी जाणीव जागृती करावी त्याला सर्वसामान्यांनी हे सर्व आपल्या सुरक्षिततेसाठी आहे याची जाणीव ठेवून सर्व नियम अवगत करून घ्यावेत असे आवाहनही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी यावेळी केले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये अत्यंत विश्लेषणात्मक अपघाताची माहिती दिली. तसेच आजच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन व उद्देश स्पष्ट केला. अपघातांची विविध कारणे, रस्ता सुरक्षामध्ये चार 'ई ' चे महत्त्व विस्तृत स्वरुपात विशद केले. प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये येणाऱ्या वाहन चालकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती व प्रबोधन होण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात उभारण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा गॅलरी बाबत मोटार वाहन निरीक्षक सुनिल शिंदे यांनी ध्वनी चित्रफित प्रदर्शित करुन त्याबाबतची माहिती दिली.
जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयात उभारण्यात आलेल्या गॅलरीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे सुनिल शिंदे व मंगेश गवारे या मोटार वाहन निरीक्षकांचा जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
*राज्य परिवहन विभागातील विना अपघात सेवा केलेल्या वाहन चालकांचा गौरव*
एस टी महामंडळाची बस चालवताना तरवडे गंगाधर तुकाराम, पाटील व्यंकटराव दगडू, जोगपेठे बालाजी गोविंद, जाधव सुकराज सुर्यभान, जाधव प्रविण शिवाजी यांनी एकही अपघात केला नाही यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
नागरिकांमध्ये जनजागृत होण्याच्या अनुषंगाने रस्ता सुरक्षा विषयक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आल. यावेळी रस्ता सुरक्षिततेसाठीची सर्वांना शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतिश सुर्यवंशी, व श्रीमती गोदावरी काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा गणेश कदम यांनी केले.
स्कुल बस, ट्रॅव्हल्स असोसिएशनचे पदाधिकारी, मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक, जे.एस.पी.एम. महाविद्यालय व दयानंद महाविद्यालयातील विद्यार्थी, मोटार वाहन निरीक्षक, सहा मोटार वाहन निरीक्षक कार्यालयातील कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
إرسال تعليق