सेवा संकल्प अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सेवा संकल्प अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
लातूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 'सेवा संकल्प अभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, स्वच्छतेची सवय, व्यसनमुक्ती तसेच सर्जनशीलता आणि सामाजिक बांधीलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या अभियानांतर्गत ३० सप्टेंबर २०२६ रोजी 'माझ्या स्वप्नातील भारत तथा विकसित भारत २०४७' या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील २ हजार १३२ शाळांमधील १ लाख ५३ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यामध्ये लातूर तालुक्यातील २७८ शाळांमधील ३६,२३५ विद्यार्थी, औसा तालुक्यातील २१३ शाळांमधील २,१४५ विद्यार्थी, निलंगा तालुक्यातील १८६ शाळांमधील १,८६५ विद्यार्थी, देवणी तालुक्यातील १०२ शाळांमधील ७५६ विद्यार्थी, उदगीर तालुक्यातील २८४ शाळांमधील २,४५६ विद्यार्थी, जळकोट तालुक्यातील १०७ शाळांमधील ७०५ विद्यार्थी, चाकूर तालुक्यातील १६५ शाळांमधील १७,२५६ विद्यार्थी, अहमदपूर तालुक्यातील २४१ शाळांमधील १४,४४७ विद्यार्थी, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ८३ शाळांमधील ८,५४३ विद्यार्थी आणि रेणापूर तालुक्यातील १४३ शाळांमधील १,९५६ विद्यार्थी सहभागी झाले. याशिवाय लातूर अर्बन रिसोर्स सेंटर (युआरसी)- १ अंतर्गत १४५ शाळांमधील २५,२२२ विद्यार्थी तर लातूर अर्बन रिसोर्स सेंटर (युआरसी)-२ अंतर्गत १८५ शाळांमधील ४२,१७५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. 

सेवा संकल्प अभियानांतर्गत यापूर्वी २६ सप्टेंबर २०२६ रोजी स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले आहे. तसेच पुढील टप्प्यात ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रकला स्पर्धा, ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी 'माझी शाळा सुंदर शाळा/सण, उत्सव बदलते स्वरूप' या विषयावर निबंधलेखन स्पर्धा आणि १० ऑक्टोबर २०२६ रोजी रॅली, पथनाट्य व व्याख्यानांच्या माध्यमातून 'व्यसनमुक्त भारत जनजागृती' हे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. शाळास्तरावरून उत्कृष्ट चित्रे व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांची निवड करून त्यांचे व्हीडीओ व चित्रे तालुकास्तरावर पाठवले जातील आणि तालुकास्तरावरून प्रथम आलेल्या विजेत्यांची नावे जिल्हा स्तरावर पाठवून अंतिम तीन विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणधिकारी विकास कुकडे यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم