विद्यार्थ्यांनी आपल्याबरोबरच संस्थेचा नावलौकिक राज्यात वाढविण्याचे कार्य करावे- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर


विद्यार्थ्यांनी आपल्याबरोबरच संस्थेचा नावलौकिक राज्यात वाढविण्याचे कार्य करावे
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर-जेएसपीएम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिवाजीराव पाटील कव्हेकर कॉलेज ऑफ फार्मसी सुरू आहे. अत्यंत कमी कालावधीमध्ये या कॉलेजचा नावलौकिक झालेला असून पहिल्या राऊंडमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. इंजिनिअरिंग कॉलेजची तीच परिस्थिती आहे. परंतु इतर व्यवसायाबरोबर प्रामाणिकता, माणुसकी यावर विसंबून असणारा फार्मसीचा व्यवसाय आहे. या माध्यमातून मानवाला वैद्यकीयदृष्ट्या जीवंत ठेवण्याचे कार्य केले जाते. त्यातही आता सर्व क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञान आलेले आहे. त्यामुळे कृषी, शिक्षण, सहकार, वैद्यकीय अशा सर्व क्षेत्रांतील विद्यार्थ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्याबरोबर आपल्या संस्थेचा नावलौकिक राज्यात वाढविण्याचे कार्य अविरतपणे करावे, असे आवाहन जेएसपीएम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते जेएसपीएम संचालित शिवाजीराव पाटील कव्हेकर कॉलेज ऑफ फार्मसीच्यावतीने जागतिक फार्मसी डे निमित्त आयोजित पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या सभागृहात बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, प्राचार्य सचिन गोळवे, पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळाचे सदस्य प्रा. सतीश शेळके, प्राचार्य नागेश स्वामी, प्राचार्य डॉ. अझीम काझी, डॉ. अभिजीत यादव, समन्वयक विनोद जाधव, पी.टी.ओ. अजय बिराजदार, प्राचार्य जगदीश गिरी, प्रोग्राम कोऑर्डिनेटर गायत्री पाटील, ऋषिकेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ. कव्हेकर म्हणाले की, स्पर्धेच्या युगामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करणे चांगले असले तरी त्याचा दुरुपयोगही होत आहे. डॉ. तात्याराव लहाने हे येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ आहेत. त्यांच्या फोटोचा वापर करून एआय तंत्रज्ञानाद्वारे चुकीची माहिती देण्याचे कार्य झालेले आहे. याबाबत अशी चुकीची माहिती देणार्‍या व्यक्तीवर कार्यवाही करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपण डॉ. एम. सी. मोदी यांचा डोळ्याचा कॅम्प घेऊन 10 हजार जणांनी तपासणी तर 1100 नागरिकांना नवीन दृष्टी देण्याचे कार्य केलेले आहे.
सध्याच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर ज्ञानही देणे गरजेचे झालेले आहे. निधर्मीपणाच्या नावाखाली आपण हुमायू कोण, निजाम कोण याबाबत माहिती देण्याचे काम केले. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, प्रभू रामचंद्र कोण याबाबत पुरेशी माहिती देण्याचे काम केलेले नाही. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जुनी शिक्षणपद्धती रद्द करून नवीन सीबीसीएस शिक्षणपद्धती लागू करण्याचे काम केलेले आहे. मध्यप्रदेश सरकारने शिक्षणामध्ये भगवद्गीतेचा समावेश केलेला आहे. त्याचप्रमाणे येथील शिक्षणपद्धतीमध्येही योगासन, प्राणायाम, अध्यात्माचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंदांनी अठराव्या शतकात केलेली भविष्यवाणी खरी ठरून 2047 मध्ये भारत महासत्ता बनून विश्वगुरू बनेल, असा विश्वासही माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवी व फार्मसीचे जनक प्रो. महादेवलाल श्रॉफ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख मान्यवरांचा सन्मान संयोजन समितीच्यावतीने करण्यात आला. यावेळी डॉ. अभिजित यादव, प्राचार्य नागेश गोळवे, नागेश स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जगदीश गिरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली सोनवणे यांनी केले, तर आभार पल्लवी हराळे यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमाला प्राध्यापक व इतर कर्मचार्‍यांसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

फार्मसीच्या विद्यार्थ्यांना देशात नोकरीच्या मोठ्या संधी आहेत
- अजित पाटील कव्हेकर
शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहेत. तरीही इतर शिक्षणापेक्षा भारत देशातील फार्मसी इंडस्ट्रीज खूप मोठी आहे. त्यामुळे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, मेडिकल ऑफिसर, फार्मासिस्ट अशा अनेक जागा विविध कंपन्यांमध्ये आहेत. त्यामुळे फार्मसीमध्ये पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना नोकरीच्या मोठ्या संधी राहणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी फक्त आपण घेत असलेल्या शिक्षणामध्ये अपडेट राहणे गरजेचे आहे. आपणही एक संस्थाचालक म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे योग्य ते वातावरण व संधी उपलब्ध करून देण्याचे काम आपण करू. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संस्थेने दिलेल्या संधीचा लाभ घेऊन आपले शिक्षण चांगल्या पद्धतीने पूर्ण करावे. देशाच्या फार्मसी इंडस्ट्रीजमध्ये या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या संधी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळणार्‍या संधीचे सोने करावे, असे आवाहन जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केले.

विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणारी जेएसपीएम शिक्षण संस्था
- प्राचार्य अझीम काझी
जेएसपीएम शिक्षण संस्था संचालित शिवाजीराव पाटील कव्हेकर कॉलेज ऑफ फार्मसी हे कॉलेज गुणवत्तापूर्ण पद्धतीने सुरू आहे. या महाविद्यालयाची सुरुवात होऊन दोन वर्षे झालेले आहेत. या अतिशय अल्पशा कालावधीतही सर्व सुविधा, तज्ज्ञ प्राचार्य, प्राध्यापक व इतर कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने केलेले आहे. या संस्थेत शिक्षण घेणारा विद्यार्थी उत्कृष्ट फार्मासिस्ट म्हणून बाहेर पडणार आहे. त्यामुळे अध्यात्म, विज्ञान व व्यावसायिकतेवर आधारित तेजस्वी तरुण घडविणारी जेएसपीएम शिक्षण संस्था आहे, असे प्रतिपादन प्राचार्य अझीम काझी यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم