शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, आलमला येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत
औसा/प्रतिनिधी -औशाचे सुपुत्र सय्यद अब्दुल अजीम अब्दुल अजिज यांनी फार्मसी क्षेत्रातील संशोधनाची सर्वोच्च शैक्षणिक पदवी पीएच.डी. (Doctor of Philosophy) यशस्वीरीत्या संपादन करून औसा शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांनी नुकतीच आपली अंतिम मौखिक परीक्षा यशस्वीपणे पार पाडली.
डॉ. सय्यद अब्दुल अजीम हे सध्या शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, आलमला येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. वनस्पती आणि त्यातील वनस्पतीजन्य घटकांचा वापर करून फोटो एजिंगच्या व्यवस्थापनासाठी हर्बल क्रीमची एक नवीन रचना करत त्यांनी फार्मसी क्षेत्रातील संशोधन कार्य पूर्ण करत आपला पीएच.डी. प्रबंध यशस्वीरीत्या सादर केला. अंतिम मौखिक परीक्षेदरम्यान त्यांनी आपल्या संशोधन कार्याचे प्रभावीपणे सादरीकरण करून परीक्षकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी तसेच औसा शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिक्षण व संशोधन क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, विद्यार्थी आणि शुभचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व संशोधन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना डॉ. सय्यद अब्दुल अजीम यांनी अल्लाहची कृपा, आई-वडिलांच्या आशीर्वादासह कुटुंबीय, आपल्या संशोधन मार्गदर्शक डॉक्टर विजय तांबे सर, तसेच विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला द्वारा संचालित शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी चे अध्यक्ष शिवचरण जी धाराशिवे साहेब, सचिव बसवराज जी धाराशिवे सर, उपसचिव महादेव जी खिचडे सर, प्राचार्य डॉ. विश्वेश्वर धाराशिवे सर तसेच सर्व विभाग प्रमुखांचे मार्गदर्शन सोबतच शिक्षक, सहकारी आणि शुभचिंतकांच्या दुआ, प्रेम व सातत्यपूर्ण सहकार्याला या यशाचे श्रेय दिले.
त्यांची ही यशस्वी कामगिरी केवळ त्यांच्या वैयक्तिक शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा नसून औसा व परिसरातील विद्यार्थी, शिक्षक आणि युवा संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
إرسال تعليق