खाजगी फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुली तात्काळ थांबवावी-काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांचा इशारा

खाजगी फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुली तात्काळ थांबवावी-काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांचा इशारा
निलंगा : सध्या निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पावसाअभावी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, हाताला काम नसल्याने अनेक कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत खाजगी फायनान्स कंपन्या आणि गावोगावी बचत गटांना कर्जवाटप करणाऱ्या स्मॉल फायनान्स कंपन्यांकडून घरोघरी जाऊन सक्तीने कर्जवसुली केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ही वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सरकारने कर्जवसुली थांबविण्याबाबत सूचना दिल्या असतानाही काही खाजगी फायनान्स कंपन्यांकडून कर्जदारांवर वसुलीसाठी दबाव टाकला जात असल्याचे साळुंके यांनी म्हटले आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि महिलांना अशा प्रकारच्या सक्तीच्या वसुलीमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माणुसकीच्या दृष्टिकोनातून वागावे, असे आवाहन त्यांनी केले. पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न आलेले नाही. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांनाही पुरेसे काम मिळत नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावणे आणि सक्तीने वसुली करणे अन्यायकारक आहे. त्यामुळे खाजगी फायनान्स कंपन्या तसेच स्मॉल फायनान्स संस्थांनी तातडीने कर्जवसुली थांबवून संकटग्रस्त कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी मागणी साळुंके यांनी केली. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी व शेतमजुरांना त्रास होईल, असे कोणतेही कृत्य फायनान्स कंपन्यांनी करू नये. कर्जवसुलीच्या नावाखाली नागरिकांवर दबाव टाकणे थांबवावे. प्रशासनानेही परिस्थितीची दखल घेऊन शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करत शेतकरी व शेतमजुरांसाठी काॅग्रेस रस्त्यावर उतरेल याची नोंद घ्यावी असा इशारा त्यांनी दिला आहे........

Post a Comment

أحدث أقدم