जळीत ऊस पिकाची धिरज विलासराव देशमुख यांच्याकडून पाहणी;
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर,
जळीत ऊस गाळपासाठी संबंधित साखर कारखान्यांना केल्या सूचना
लातूर : लातूर ग्रामीणमधील एकुर्गा येथील श्री. बालाजी घुटे आणि वाकडी येथील श्री. नागनाथ सोमासे यांच्या शेतातील आगीमुळे नुकसान झालेल्या ऊस पिकाची लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पाहणी केली.
यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच, जळीत ऊस गाळपासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित साखर कारखान्यांना दिल्या.
शेतकरी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने पीक उभे करतात. मात्र, आगीसारख्या संकटामुळे डोळ्यांसमोर उभे असलेले पीक जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. शेतकऱ्यांच्या कष्टांची आणि त्यांच्या भावनांची जाणीव असल्याचे सांगत, या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक असल्याचे धिरज देशमुख यांनी नमूद केले.
संकट कितीही मोठे असले, तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही. त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना दिलासा देण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा विश्वासही धिरज विलासराव देशमुख यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.या पाहणी दरम्यान विविध संस्था पदाधिकारी, शेतकरी आदींची उपस्थिती होती.
إرسال تعليق