कुमारस्वामी महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात; शिवानी पवार प्रथम
औसा : येथील श्री कुमारस्वामी महाविद्यालयात ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रंथालय विभाग आणि सौ. शिवकांता दिलीप कदम यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय काळे यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. प्रसाद कदम आणि डॉ. जांबुवंतराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रंथपाल डॉ. अंबादास खिलारे यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला.
स्पर्धेसाठी ‘मोबाईल : एक घातक व्यसन’, ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’ आणि ‘वाचन वाढवा, जीवन घडवा’ हे तीन विषय ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडत वक्तृत्वकलेचे दर्शन घडविले.
या स्पर्धेत बी.एस्सी. द्वितीय वर्षातील कु. शिवानी राजेंद्र पवार हिने प्रथम क्रमांक पटकावला. अकरावी विज्ञान शाखेतील कु. शुभांगी अशोक जाधव हिने द्वितीय, तर बारावी विज्ञान शाखेतील कु. सृष्टी नाना चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळविला. बारावी विज्ञान शाखेतील कु. दीपाली सुभाष जाधव हिची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड करण्यात आली.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. सुधीर गरड आणि डॉ. दयानंद पटवारी यांनी काम पाहिले. यावेळी डॉ. बळवंत घोगरे, प्रा. प्रशांत उघाडे, प्रा. अथर्व कारंजे, प्रा. रवी जाधव, दीपाली मानकरी, सुनीता कल्याणी, लिंगेश्वर चिरबंदे, राहुल कांबळे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, विचारशक्ती विकसित व्हावी आणि वक्तृत्वकौशल्याला चालना मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
إرسال تعليق