अन्न, वस्त्र, निवारा इतकीच वाचनाची चौथी मूलभूत गरज - डॉ. जयद्रथ जाधव

अन्न, वस्त्र, निवारा इतकीच वाचनाची चौथी मूलभूत गरज - डॉ. जयद्रथ जाधव

लातूर - समाजात एक जबाबदार नागरिक बनायचे असेल तर अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांइतकीच वाचनाची चौथी गरज महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन शिवाजी महाविद्यालय, रेणापूर येथील प्रा. डॉ. जयद्रथ जाधव यांनी केले.
दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
डॉ. जाधव पुढे म्हणाले, काय वाचावे आणि काय वाचू नये याचे संस्कार घरातूनच होत असतात. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले. ते नेहमी म्हणायचे, 'ग्रंथासारखा दुसरा मित्र नाही'. ज्यांना जीवनात अशक्य बदल घडवून आणायचे आहेत, त्यांनी ग्रंथाच्या सान्निध्यात गेले पाहिजे, वाचले पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील प्रसंग सांगताना त्यांनी सांगितले की, किर्लोस्कर गुरुजींनी डॉ. बाबासाहेबांना दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर गौतम बुद्धांचे चरित्र भेट दिले होते. वयाच्या पंधराव्या वर्षी ते चरित्र हातात पडले नसते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्व घडले नसते.संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत ते म्हणाले -आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू; शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका; तुका म्हणे पहा शब्दाची हा देव शब्दाची गौरव पूजा करू.माणसाला जगण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे सुसंस्कृतपणा आणि सुसंस्कार. सत्य किंवा असत्य याचा विचार आपण वाचनातूनच करू शकतो. ग्रंथालय ही आपली संस्कार केंद्रे आहेत, ती आपली ज्ञानपीठे आणि विचारपीठे आहेत. सुसंस्कृत समाज हा वाचनानेच घडतो.कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्या डॉ. शुभांगी पांचाळ या होत्या. अध्यक्षीय समारोपात त्यांनी दयानंद विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कायदेविषयक ज्ञानासोबतच इतर  अवांतर वाचन असेल तर कोर्टामध्ये युक्तिवाद करता येऊ शकतो, असे सांगितले. प्रास्ताविकात दयानंद विधी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. संगीता महाजन यांनी  वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना नुसती स्वप्न पाहण्यापेक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वाचन कसे आवश्यक आहे हा डॉ. कलाम यांनी दिलेला वाचनाचा मूलमंत्र अधोरेखित केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ऋतुजा गोडबोले यांनी, तर आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापक आतिश तिवारी यांनी केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم