चांदण्यांच्या शीतल प्रकाशासोबत सुख-समृद्धीचा आध्यात्मिक मार्ग !

 चांदण्यांच्या शीतल प्रकाशासोबत सुख-समृद्धीचा आध्यात्मिक मार्ग !
आकाशाच्या अंगणात आज चांदण्यांचा सडा पडला,
पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राने अंधार सारा दूर सारला,
सुख, शांती आणि समृद्धी नांदो तुमच्या दारी,
हीच प्रार्थना आजच्या या मंगलमय रात्री!

पौर्णिमा म्हटली की डोळ्यांसमोर उभे राहते ते स्वच्छ, शीतल चांदणे, मंद गार वारा आणि आकाशात तेजाने झळकणारा पूर्ण चंद्र! निसर्गाने मानवाला दिलेली ही एक अद्भुत देणगीच आहे. पौर्णिमेच्या चांदण्यांनी प्रत्येकाचे मन प्रसन्न होते. अनेक कवींनी चंद्राच्या सौंदर्यावर सुंदर कविता रचल्या आहेत, तर प्रेमवीरांनी चंद्राला साक्षी ठेवून आपल्या भावना चारोळ्यांमधून व्यक्त केल्या आहेत.

"पौर्णिमेच्या या रात्री आकाशात चांदण्यांची दाटी,
पण माझे मन मात्र झुरते फक्त तुझ्याच भेटीसाठी,
चंद्रालाही आज तुझ्या सौंदर्याचा हेवा वाटत असेल,
जेव्हा तू माझ्याकडे पाहून गोड हसत असशील!"

अशा कितीतरी आठवणी या चंद्रासोबत जोडलेल्या आहेत. बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या अनेक सुखद क्षणांचा चंद्र जणू साक्षीदार असतो. मनाला आनंद आणि प्रसन्नता देणारे हे चांदणे केवळ निसर्गसौंदर्यापुरते मर्यादित नाही, तर धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही चंद्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पौर्णिमा आणि धनप्राप्तीसाठी लक्ष्मीपूजन

धन, ऐश्वर्य आणि समृद्धी प्राप्तीसाठी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्याची परंपरा आहे. यावेळी पुढील मंत्राचा जप करावा, अशी धार्मिक मान्यता आहे.

ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद,
ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः॥

अर्थ : कमळावर विराजमान असलेल्या हे महालक्ष्मी, आमच्यावर प्रसन्न व्हा आणि कृपाशीर्वाद द्या.

मानसिक शांतीसाठी चंद्रमंत्र

ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक मानले जाते. त्यामुळे मनःशांती, भावनिक स्थैर्य आणि मानसिक प्रसन्नतेसाठी चंद्रमंत्राचा जप करणे शुभ मानले जाते.

ॐ श्रां श्रीं श्रौं सः चन्द्रमसे नमः।

अर्थ : चंद्रदेवाला माझा नमस्कार असो. त्यांच्या कृपेने मनाला शांती आणि स्थैर्य लाभो.

कोणत्या वारी आलेल्या पौर्णिमेला असते विशेष महत्त्व?

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण कलांनी युक्त असतो. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. मात्र वारानुसारही काही विशेष धार्मिक मान्यता प्रचलित आहेत.

सोमवार : सोमवार हा भगवान शंकराचा आणि चंद्राचा वार मानला जातो. सोमवारी पौर्णिमा आल्यास मानसिक शांती, मनःस्थैर्य आणि चंद्रदोष निवारणासाठी हा दिवस विशेष शुभ मानला जातो.

गुरुवार : गुरुवार हा भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांचा वार आहे. या दिवशी पौर्णिमा आल्यास ज्ञानप्राप्ती, आर्थिक भरभराट आणि वैवाहिक सौख्यासाठी पूजा-अर्चना केली जाते.

शुक्रवार : शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार मानला जातो. शुक्रवारी येणारी पौर्णिमा धन, ऐश्वर्य आणि समृद्धीच्या उपासनेसाठी विशेष शुभ मानली जाते.

पौर्णिमेला कोणते उपाय करावेत?

पौर्णिमेच्या दिवशी धार्मिक श्रद्धेनुसार काही विशेष उपाय केले जातात.

१. चंद्राला अर्घ्य : संध्याकाळी चंद्रोदयानंतर तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रातून पाणी, कच्चे दूध, थोडी साखर आणि अक्षता एकत्र करून चंद्राला अर्घ्य द्यावे. यामुळे मानसिक शांती लाभते, अशी श्रद्धा आहे.

२. लक्ष्मी-विष्णू पूजन : या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्र पूजा करावी किंवा सत्यनारायणाची पूजा करावी. रात्री माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावून श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे.

३. तुळशीपूजन : संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावून प्रार्थना करावी.

४. पिंपळपूजन : सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळवृक्षात देवतांचा वास असतो.

५. अन्नदान आणि दानधर्म : आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना तांदूळ, दूध, साखर यांसारख्या पांढऱ्या वस्तूंचे दान करावे किंवा अन्नदान करावे. दानधर्मामुळे पुण्यलाभ होतो, अशी श्रद्धा आहे.

वर्षभरातील प्रत्येक पौर्णिमेचे आहे स्वतंत्र महत्त्व!

भारतीय संस्कृतीत प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशिष्ट धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. वर्षभरातील या पौर्णिमांचे महत्त्व जाणून घेऊया.

१. चैत्र पौर्णिमा : या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. भगवान हनुमानाचा जन्मदिवस म्हणून या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार पुण्यतिथीही या दिवशी पाळली जाते.

२. वैशाख पौर्णिमा : बुद्ध पौर्णिमा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीन महत्त्वपूर्ण घटना घडल्याचे मानले जाते.

३. ज्येष्ठ पौर्णिमा : वटपौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात. सावित्री-सत्यवानाची कथा या व्रताशी जोडलेली आहे.

४. आषाढ पौर्णिमा : गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवशी महर्षी व्यासांचे स्मरण करून गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.

५. श्रावण पौर्णिमा : नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून समुद्राची पूजा करतात, तर बहीण भावाच्या हातावर राखी बांधते.

६. भाद्रपद पौर्णिमा : प्रौष्ठपदी पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवशी धार्मिक विधी आणि पूजाअर्चा केली जाते. या पौर्णिमेनंतर पितृपक्षाला सुरुवात होते.

७. आश्विन पौर्णिमा : कोजागरी पौर्णिमा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर संचार करून 'को जागर्ति?' अर्थात कोण जागे आहे, असे विचारतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे या रात्री लक्ष्मीपूजन आणि जागरण केले जाते.

८. कार्तिक पौर्णिमा : त्रिपुरारी पौर्णिमा किंवा देवदिवाळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला, अशी पौराणिक मान्यता आहे. मंदिरांमध्ये दीपमाळा प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला जातो.

९. मार्गशीर्ष पौर्णिमा : दत्त पौर्णिमा किंवा दत्त जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो. भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस म्हणून या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.

१०. पौष पौर्णिमा : शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवशी शाकंभरी देवीच्या नवरात्राची सांगता होते.

११. माघ पौर्णिमा : माघी पौर्णिमा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दानधर्म आणि धार्मिक विधी करण्याला विशेष महत्त्व आहे.

१२. फाल्गुन पौर्णिमा : हुताशनी पौर्णिमा किंवा होळी पौर्णिमा म्हणून हा दिवस ओळखला जातो. या दिवशी होलिका दहन करून वाईट प्रवृत्तींच्या नाशाचे प्रतीकात्मक दर्शन घडविले जाते. त्यानंतर रंगांचा उत्सव साजरा केला जातो.

१३. अधिक मासातील पौर्णिमा : अधिक मासात येणाऱ्या पौर्णिमेला भगवान विष्णू आणि कुलदेवतेची विशेष उपासना करण्याची परंपरा आहे. या काळात जप, तप, दानधर्म आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व दिले जाते.

अशा प्रकारे पौर्णिमा ही केवळ चंद्राच्या पूर्णत्वाची रात्र नसून निसर्ग, श्रद्धा, भक्ती, संस्कृती आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. प्रत्येक पौर्णिमा आपल्याला नवचैतन्य, सकारात्मकता आणि आनंदाचा संदेश देते.

शीतल प्रकाश चंद्राचा, मनाला देतो विसावा,
पौर्णिमेच्या या रात्री, आनंदाचा वर्षाव व्हावा,
नात्यांमधला गोडवा असाच बहरत राहो,
तुमच्या आयुष्यात सदैव सुखाचा चंद्र उगवो!

लेखिका : ज्योतिषाचार्य डॉ. सौ. सृष्टी मोरे (पंडित)
सृष्टी ॲस्ट्रो गुरुकुल, कोल्हापूर
ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, मानसोपचार समुपदेशन आणि आध्यात्मिक प्रशिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, प्रशिक्षक, लेखिका व मार्गदर्शक.
अनुभव : २३ वर्षांहून अधिक
संपर्क : ९६३७१२५११९

Post a Comment

أحدث أقدم