भाऊबीज : भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा आणि विश्वासाचा मंगलमय सण!

भाऊबीज : भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा आणि विश्वासाचा मंगलमय सण!
कपाळी लाविते चंद्रकोर,
माझा भाऊ किती ग थोर...
सोन्याची अंगठी, चांदीचे ताट,
भावाची पाहते मी लाडकी वाट...!
दिवाळीच्या दीपोत्सवाची सांगता करणारा आणि भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी अधिक दृढ करणारा गोड सण म्हणजे भाऊबीज! कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा होणारा हा सण पौराणिक परंपरेत 'यमद्वितीया' म्हणूनही ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत या सणाला विशेष महत्त्व असून, भावाच्या दीर्घायुष्याची आणि सुखी जीवनाची कामना करणारी बहीण, तर बहिणीच्या रक्षणाची आणि सुखाची जबाबदारी स्वीकारणारा भाऊ, अशा नात्यातील भावविश्वाचे सुंदर दर्शन या दिवशी घडते.

पहाटेपासूनच घराघरांत भाऊबीजेची लगबग सुरू होते. बहीण प्रेमाने आरतीचे ताट सजवते. त्यात दिवा, कुंकू, अक्षता आणि मिठाई ठेवून भावाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहते. भाऊ घरी आल्यानंतर त्याचे औक्षण करून कपाळावर टिळा लावते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊही बहिणीला ओवाळणी, भेटवस्तू देऊन तिच्या सुख-दुःखात सदैव पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन देतो. या प्रेमळ देवाणघेवाणीतून भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोडवा अधिक वाढतो.

पहाटे पहाटे आली भाऊबीज,
नभातून आली जणू अमूल्य वीज...
हातात घेऊनी आरतीचे ताट,
ओवाळिते भावाला भरूनिया कंठ...!

माहेर आणि सासर या दोन घरांना जोडणारा भावनिक पूल म्हणजे भाऊबीज. लग्नानंतर माहेर सोडून सासरी गेलेल्या बहिणीच्या मनात बालपणीच्या असंख्य आठवणी दाटून येतात. भावासोबत केलेली भांडणे, खेळलेले खेळ, एकमेकांसाठी केलेली मदत, लहानपणीचे रुसवे-फुगवे आणि आई-वडिलांच्या मायेच्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात पुन्हा जाग्या होतात. माहेरच्या अंगणात पाऊल ठेवताना डोळ्यांत आनंदाश्रू तरळतात आणि भावाला ओवाळताना कंठ दाटून येतो. या क्षणी आनंद आणि भावुकता यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो.

यमराज आणि यमुनेची पौराणिक कथा

भाऊबीज साजरी करण्यामागे एक अत्यंत भावस्पर्शी पौराणिक कथा सांगितली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, मृत्यूचे देवता यमराज आणि नदीस्वरूपातील यमुना हे सूर्यदेवाची संतती असून बहीण-भाऊ आहेत. यमराज आपल्या कार्यात सतत व्यस्त असल्याने त्यांना बहिणीच्या भेटीसाठी वेळ मिळत नसे. यमुना मात्र आपल्या भावाच्या भेटीसाठी नेहमी आतुर असायची. ती वारंवार यमराजांना आपल्या घरी येऊन भोजन करण्याचे प्रेमळ आमंत्रण देत असे.

अखेर कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी यमराज बहिणीच्या घरी पोहोचले. आपल्या लाडक्या भावाला दारात पाहून यमुनेचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने भावाचे मनापासून स्वागत केले. त्याचे औक्षण केले, कपाळावर कुंकवाचा टिळा लावला आणि प्रेमाने स्वादिष्ट भोजन वाढले. बहिणीच्या या आदरातिथ्याने आणि निःस्वार्थ प्रेमाने यमराज प्रसन्न झाले. त्यांनी यमुनेला इच्छित वरदान मागण्यास सांगितले.

त्यावेळी यमुनेने स्वतःसाठी कोणताही स्वार्थी वर न मागता जगातील सर्व भावांच्या कल्याणासाठी वरदान मागितले. कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी जी बहीण आपल्या भावाला प्रेमाने घरी बोलावून त्याचे औक्षण करेल, कपाळावर टिळा लावेल आणि भोजन देईल, तसेच जो भाऊ बहिणीच्या घरी जाऊन तिच्या हातचे भोजन ग्रहण करेल, त्या भावाला अकाली मृत्यूची भीती राहू नये, असे वरदान तिने मागितले. यमराजांनीही ते वरदान दिले, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

याच आख्यायिकेमुळे भाऊबीजेला 'यमद्वितीया' असे म्हटले जाते. या दिवशी बहिणीकडून औक्षण करून घेणाऱ्या भावाला दीर्घायुष्य लाभते आणि अकाली मृत्यूपासून संरक्षण मिळते, अशी श्रद्धा आजही समाजात प्रचलित आहे.

श्रीकृष्ण आणि सुभद्रेची आख्यायिकाही प्रचलित

भाऊबीजेशी संबंधित आणखी एक पौराणिक कथा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची बहीण सुभद्रा यांच्याशी जोडली जाते. नरकासुराचा वध करून भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतल्यानंतर सुभद्रेने त्यांचे प्रेमाने स्वागत केले. तिने श्रीकृष्णांच्या कपाळावर टिळा लावून त्यांचे औक्षण केले आणि त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली. या कथेतूनही भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि परस्परांविषयीची आत्मीयता अधोरेखित होते.

नात्यातील प्रेम, विश्वास आणि कर्तव्याची जाणीव

भाऊबीज हा केवळ धार्मिक विधी किंवा भेटवस्तूंचा सण नाही, तर तो भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव आहे. काळ बदलला, जीवनशैली बदलली, माणसे कामानिमित्त दूर गेली, तरी या नात्यातील प्रेम कधीच कमी होत नाही. भाऊ कितीही मोठा झाला तरी बहिणीसाठी तो लहानपणीचाच लाडका भाऊ असतो, तर बहीण कितीही दूर असली तरी भावाच्या मनात तिचे स्थान कायम विशेष असते.

आजच्या धावपळीच्या जीवनात नात्यांमधील संवाद आणि आपुलकी जपण्याची गरज अधिक वाढली आहे. अशा वेळी भाऊबीजेसारखे सण कुटुंबातील नाती पुन्हा एकदा जवळ आणण्याचे काम करतात. बहिणीने भावाच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना आणि भावाने बहिणीच्या सुखासाठी दिलेला आधार, हीच या सणाची खरी श्रीमंती आहे.

घरोघरी उजळल्या दिव्यांच्या ज्योती,
भावा-बहिणीचे नाते जसे हिरे अन् मोती...
ओवाळिते भाऊराया आज तुला मी,
सदा सुखी राहा तू या जगती...!

अशा या प्रेम, माया, विश्वास आणि आपुलकीच्या मंगलमय भाऊबीजेच्या सणानिमित्त प्रत्येक भावाला दीर्घायुष्य लाभो आणि प्रत्येक बहिणीच्या आयुष्यात सुख, समाधान व आनंद नांदो, हीच सदिच्छा!

लेखिका : ज्योतिषाचार्य डॉ. सौ. सृष्टी मोरे (पंडित)
सृष्टी ॲस्ट्रो गुरुकुल, कोल्हापूर
ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, मानसोपचार समुपदेशन व आध्यात्मिक प्रशिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, प्रशिक्षक, लेखिका व मार्गदर्शक.
अनुभव : २२ वर्षांहून अधिक
संपर्क : ९६३७१२५११९

Post a Comment

أحدث أقدم