कर्जवसुली थांबवण्याबाबत शासन निर्णय काढावा; आमदार कैलास पाटील यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

 कर्जवसुली थांबवण्याबाबत शासन निर्णय काढावा; आमदार कैलास पाटील यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

धाराशिव : मायक्रो फायनान्स कंपन्या व खासगी वित्तीय संस्थां मनमानी कर्ज वसुली करत आहेत. यावर कोणाचं नियंत्रण नसल्याने यासाठी लेखी आदेश किंवा शासन निर्णय काढल्यास त्यामुळं याच्यावर दबाव येईल. यासाठी असा शासन निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला व सर्वसामान्य नागरिकांची मायक्रो फायनान्स कंपन्या, खासगी वित्तीय संस्था, खासगी बँका व इतर कर्जपुरवठादारांकडून होणाऱ्या बेकायदेशीर कर्जवसुलीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने तातडीने ठोस शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्या व खासगी वित्तीय संस्थांच्या वसुली प्रतिनिधींकडून कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी कर्जदारांना वारंवार फोन करणे, त्यांच्या घरी जाऊन तगादा लावणे, धमकावणे, अपमानास्पद वागणूक देणे, कुटुंबीयांसमोर बदनामी करणे तसेच मानसिक दबाव निर्माण करणे, अशा प्रकारांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. विशेषतः महिला बचत गटातील सदस्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना या प्रकारांचा गंभीर त्रास सहन करावा लागत आहे.
धाराशिव जिल्हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून, अनियमित पाऊस, अतिवृष्टी, पिकांचे नुकसान, दुष्काळी परिस्थिती आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिक आधीच आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक अडचणींमुळे कर्जाचे हप्ते वेळेवर भरता न आल्यास संबंधित कर्जदारांना धमकावणे, मानसिक त्रास देणे अथवा कुटुंबीयांसमोर अपमानित करून तगादा लावून कर्जवसुली करणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांना आमदार कैलास पाटील यांनी सांग‍ितले.
शासनाच्या वतीने वेळोवेळी पत्रकार परिषदांमधून खासगी वित्तीय संस्थांना तगादा लावून कर्जवसुली करू नये, अशा सूचना दिल्या जातात. मात्र, याबाबत स्पष्ट आणि ठोस शासन निर्णय अथवा बंधनकारक मार्गदर्शक सूचना नसल्यामुळे काही वित्तीय संस्था मनमानी पद्धतीने वसुली करीत आहेत. संबंधित वसुली प्रतिनिधींना जाब विचारल्यास ते शासनाचा अधिकृत निर्णय दाखविण्याची मागणी करतात. त्यामुळे सर्वसामान्य कर्जदारांची मोठी अडचण होत असून, केवळ तोंडी सूचना देऊन हा प्रश्न सुटणार नाही. कोरोना (COVID-19) काळात खासगी बँका, फायनान्स कंपन्या (NBFCs) आणि मायक्रो फायनान्स संस्थांनी शेतकऱ्यांकडून तसेच सर्वसामान्य कर्जदारांकडून जबरदस्तीने कर्ज वसुली करू नये, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २७ मार्च २०२० आणि २३ मे २०२० रोजी काढलेले 'मोरॅटोरियम' (कर्ज हप्ते स्थगिती) परिपत्रके सर्वात महत्त्वाची आणि कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहेत असे न‍िर्देश द‍िले होते. तसेच या काळात हप्ते न भरल्यास दंड आकारू नये आणि कर्जदाराचा 'सिबिल' (CIBIL) स्कोअर खराब करू नये, असेही स्पष्ट निर्देश होते. त्याच धर्तीवर दुष्काळी पर‍िस्थ‍िती असल्यामुळे  शासनाने अधिकृत शासन निर्णय निर्गमित करून अशा संस्थांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी घरासमोर जाऊन तगादा लावून बेकायदेशीर कर्जवसुलीला प्रतिबंध करण्यासाठी संबंधित वित्तीय संस्थांच्या वसुली प्रतिनिधींच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, कर्जदारांना धमकावणे व मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध करणे, कर्जवसुलीची प्रक्रिया सन्मानपूर्वक व नियमबद्ध पद्धतीने राबविणे, नागरिकांच्या तक्रारींसाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करणे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वित्तीय संस्था व त्यांच्या प्रतिनिधींवर कठोर कारवाई करण्याबाबत शासनाने स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
या मागणीची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा बेकायदेशीर कर्जवसुलीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर आवश्यक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील तसेच यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर, महिला व सर्वसामान्य नागरिकांना कर्जवसुलीच्या नावाखाली मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणूक सहन करावी लागू नये, यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका आमदार कैलास पाटील यांनी यावेळी मांडली.

Post a Comment

أحدث أقدم