गावठाण जमिनीवर अतिक्रमण केल्याने दस्यत्व रद्द

 गावठाण जमिनीवर अतिक्रमण

केल्याने दस्यत्व रद्द

 औसा- तालुक्यातील शिवणी (बु.) येथील मागासवर्गीय समाजासाठीच्या गावठाण जमिनीवर अतिक्रमण केल्याने लक्ष्मण श्रीकृष्ण जाधव यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरविले आहे. याप्रकरणी माजी सरपंच तानाजी घोडके यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती.या ग्रामपंचायतीची निवडणूक २०२१ मध्ये झाली होती. या निवडणुकीत येथील लक्ष्मण जाधव यांनी वॉर्ड क्रमांक दोनमध्ये खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. यात ते विजयी झाले होते. शिवनी येथील जुने मागासवर्गीय समाजासाठी देण्यात आलेली गावठाणची जमीन शेतशेजारी असलेले लक्ष्मण जाधव हे अतिक्रमण करून कसत होते. याबद्दल गावातील काहींनी जाधव व त्यांच्या आई रुक्मिणीबाई जाधव यांच्याविरुद्ध औसा न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याप्रमाणे भूमी अभिलेखचे उपधीक्षक यांनी मोजणी व पंचनामा करून नकाशा तयार केला होता.त्याप्रमाणे रुक्मिणी जाधव यांनी २५ आर. जमिनीवर अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाले होते. तक्रारदार तानाजी घोडके यांनी या नकाशाचा आधार घेत जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे अर्ज सादर केला. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी सुनावणी घेतली.युक्तीवादादरम्यान लक्ष्मण जाधव यांनी आई रुक्मिणी जाधव व लक्ष्मण जाधव हे विभक्त राहत असल्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मोजणी नकाशा चुकीचा असल्याचे सांगितले. परंतु, मोजणी ही उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने केली असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष्मण जाधव यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र घोषित केले. तक्रारदाराच्यावतीने ऍड. नीलेश मुचाटे यांनी बाजू मांडली.

Post a Comment

أحدث أقدم