शेतकर्यांना अधिकाधिक नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी बांधील-अरविंद पाटील निलंगेकर
निलंगा/प्रतिनिधी ः- शेतकर्यांसाठी खरीप हंगाम अतिशय महत्वाचा समजला जातो. मात्र यावर्षी अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि किड प्रादुर्भाव यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन सह इतर पिके शेतकर्यांच्या हातातून गेली आहेत. निलंगा तालुक्यातील कांही भागामध्ये खोड अळीमुळे सोयाबीन उभे असले तरी त्याला फुल आणि फळ याची धारणा न झाल्याने हे पिक पुर्णपणे हातातून गेले आहे. शेतकर्यांना पुन्हा उभा करण्यासाठी राज्य सरकार नुकसानभरपाई देणार असले तरी निलंगा तालुक्यातील शेतकर्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण बांधील राहू अशी ग्वाही भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
निलंगा तालुक्यातील अनसरवाडा, बेडगा, जामगा यासह परिसरातील शेती बांधावर जाऊन अरविंद पाटील निलंगेकर यांनी खोड आळीमुळे झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकर्यांना दिलासा देत त्यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, नायब तहसिलदार घनशाम अडसूळ, चेअरमन दगडू साळूंके, प्राध्यापक शेषेराव ममाळे, ज्ञानेश्वर बरमदे, तानाजी बिराजदार, प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती.
लातूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सोयाबीनचा पेरा 80 टक्क्यापेक्षा अधिक करण्यात येतो. याहीवर्षी शेतकर्यांनी मोठ्या आशेने खरीप हंगामासाठी पेरणी केली होती. मात्र सतत पडणारा पाऊस, गोगलगाय व इतर किडरोगाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकर्यांच्या हातातून खरीप हंगाम पुर्णपणे गेल्याची जाणीव सरकारला असल्याचे सांगत अरविंद पाटील निलंगेकर यांनी नैसर्गिक रित्या शेतीचे नुकसान झाले असल्याचे यावेळी स्पष्ट केले. कांही भागामध्ये सततचा पाऊस तर कांही भागांमध्ये किड प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन व इतर पिके पुर्णपणे हातातून गेली आहेत. त्याचबरोबर यातूनही कांही भागामध्ये पिकांची वाढ झालेली असली तरी त्यावर खोड आळीचा प्रादुर्भाव झाल्याने फुल आणि फळ लागलेले नसल्याचे सांगत अरविंद पाटील निलंगेकर यांनी खरीप हंगाम हातातून गेल्यामुळे शेतकरी संकटात आला असल्याचे सांगितले. मात्र शेतकर्यांच्या शेती नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने कार्यवाही सुरु केली असून या कार्यवाहीनंतरही अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. यामुळे पुन्हा एकदा या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला सुचना केल्या असल्याची माहिती अरविंद पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिली.
शेतकरी हितासाठी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगत खरीप हंगामातील झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडे आपण पाठपुरावा करू असे सांगितले. राज्य शासन मदत करणार असले तरी निलंगा तालुकासह मतदारसंघातील शेतकर्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई कशापद्धतीने मिळेल यासाठी आपण बांधील असू याकरीता विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी अरविंद पाटील निलंगेकर यांच्या समवेत किशोर जाधव, नागेश पाटील, सरपंच ओम गिरी, धनराज माने, मोहन माने, मारूती शिंदे, विलास पाटील, श्रीमंत धुमाळ, संजय भरगांडे, राजू पाटील, विश्वजित उसनाळे, प्रशांत उसनाळे, नयन माने, सुभाष शिंदे, प्रकाश शिंदे, गोरख माने आदींसह परिसरातील शेतकर्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
إرسال تعليق