हैदराबाद मुक्ती संग्रामाचा इतिहास पुन्हा नव्याने पाहण्याची वेळ येऊन ठेपलीय : निळू दामले

 हैदराबाद मुक्ती संग्रामाचा इतिहास पुन्हा नव्याने 

पाहण्याची वेळ येऊन ठेपलीय : निळू दामले 






लातूर :  सध्याच्या प्राप्त परिस्थितीत हैदराबाद मुक्ती संग्रामाचा इतिहास पुन्हा एकदा नव्याने पाहण्याची वेळ येऊन ठेपली आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक निळू दामले यांनी केले. 
                             बाबासाहेब परांजपे फाउंडेशन, लातूर  अंतर्गत  हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी  वर्षानिमित्त वर्षभर विविध  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अमृत महोत्सवी वर्षाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी रात्री दयानंद सभागृहात पार पडला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून निळू दामले बोलत होते. या सोहळ्याचे उद्घाटन माजी खा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालालजी सुराणा हे होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मुर्गाप्पा खुमसे, जीवनधर  शहरकर गुरुजी,  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण  लाहोटी, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूर शहर मनपाचे आयुक्त अमन  मित्तल, अमृत महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष एड. मनोहरराव गोमारे, बाबासाहेब परांजपे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. हरीश देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भाऊसाहेब उमाटे लिखित ' शौर्यगाथा : हैदराबाद मुक्तिसंग्रामाची " या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन समारंभही पार पडला. 
                       यावेळी आपले विचार व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार - लेखक निळू दामले म्हणाले की, हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा हा केवळ हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील लढा  नव्हता. कारण त्यावेळी मुस्लिमांची सत्ता असली तरी नागरिक हिंदूच होते. आज जगभरातील राजकीय वातावरण बदलेले दिसून येते. आपल्या देशावर ब्रिटिशांनीही राज्य केले. पण त्यावेळी कधीही जाती भेद दिसून आला नाही.कारण हा देश सर्वांचा आहे, कोणत्याही ठराविक जात -धर्माचा नाही. आजचे राजकारण अत्यंत बिभत्स  होताना दिसत आहे. सत्तेसाठी राजकीय मंडळी दंगली घडविणे , लोकात फूट पाडण्यासाठीही मागे - पुढे पाहत नाहीत. संबंध देशभर लोकशाही नको ही समस्या होऊन बसलीय. त्यामुळे हा इतिहास पुन्हा नव्याने पाहण्याची वेळ येऊन ठेपल्याचे दामले म्हणाले . 
डॉ. जनार्दन वाघमारे यांनी यावेळी बोलताना निजाम इस्लामिक राज्य व्हावे म्हणून प्रयत्नशील होता, पण त्याची आई जन्माने हिंदू होती, तिने नंतर मुस्लिम धर्म स्वीकारला असे सांगितले. अत्यंत धूर्त असणाऱ्या निजामाला इस्मालचा खूप अभिमान होता. त्याने उर्दू भाषेला प्रचंड महत्व दिले. जगातील चांगल्या ग्रंथांचे  त्याने उर्दूत भाषांतर करून घेतले होते. निजामाविरुद्धचा लढा हा धार्मिक, आर्थिक, भाषिक असा अत्यंत गुंतागुंतीचा होता. मराठवाडा  मागच्या सातशे वर्षांपासून  गुलामीत राहिल्याने तो अद्यापही मागास राहिला आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वानी एकत्रित येणे गरजेचे असल्याचेही वाघमारे यांनी नमूद केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पन्नालालजी सुराणा यांनी हैदराबाद मुक्तीचा हा लढा संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक लढा असल्याचे सांगितले. खऱ्या अर्थाने जनतेचे राज्य निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण होणे आवश्यक आहे,असेही ते म्हणाले. 
या कार्यक्रमाचे प्रास्तविक मनोहरराव गोमारे यांनी केले. जिल्हाधिकारी पृथ्वीराज, लाहोटी यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.  प्रास्तविकात  त्यांनी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची  माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक सौताडेकर व शैलजा कारंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन रमेश चिल्ले यांनी केले. यावेळी  देऊळगावकर, सूर्यकांत वैद्य, उदय गवारे, प्रा. डॉ.सदाशिव दंदे , माणिकराव कोकणे, डॉ. नागोराव कुंभार,डॉ. बी.आर.  पाटील,संभाजी लांडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
------------------------


Attachments

Post a Comment

أحدث أقدم