‘लातूर ग्रंथोत्सव-2022’चे उद्घाटन
लातूर : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय यांच्यावतीने नगर भवन (टाऊन हॉल) येथे सोमवारपासून (दि. 21) दोन दिवसीय ‘लातूर ग्रंथोत्सव 2022’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्धन वाघमारे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार रमेश कराड, आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार संजय बनसोडे, आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., ग्रंथालय संचालक द. आ. क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, ग्रंथालय सहायक संचालक सुनील हुसे, जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हावगीराव बेरकिळे यावेळी उपस्थित राहतील.
तत्पूर्वी सोमवारी सकाळी 9 वाजता जुने जिल्हाधिकारी कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन केले जाणार आहे. आत्मकथनकार सुनिता अरळीकर यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार असून प्रसिद्ध कथाकार व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील.
दुसऱ्या सत्रात दुपारी 2 वाजता ‘विद्यार्थी वाचक संवाद’ आयोजित करण्यात आला असून याचे संयोजन अनिता यलमट्टे करतील. तिसऱ्या सत्रात दुपारी 3 वाजता कादंबरीकार, ज्येष्ठ साहित्यिक आणि 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शेषराव मोहिते यांची प्रकट मुलाखत होईल. समीक्षक डॉ. जयद्रथ जाधव आणि डॉ. ज्ञानदेव राऊत ही मुलाखत घेणार आहेत. चौथ्या सत्रामध्ये दुपारी चार वाजता कवी संमलेन होणार असून प्रसिद्धी कवयित्री शैलजा कारंडे-नागिमे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील.
ग्रंथोत्सावाच्या दुसऱ्या दिवशी, 22 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम’ या विषयावरील परिसंवाद होणार आहे. इतिहास संशोधक तथा विचारवंत डॉ. सोमनाथ रोडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात प्रा. भूषणकुमार जोरगुलवार, प्रा. डॉ. सदाशिव दंदे, प्रा. डॉ. सतीश यादव, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सहशिक्षक भाऊसाहेब उमाटे आपले विचार मांडतील. दुपारी साडेबारा वाजता ‘डिजिटल युगातील वाचन संस्कृती पुढील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत तथा विचारशलाकाचे संपादक प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात मनपा उपायुक्त श्रीमती मयुरा शिंदेकर, इतिहास अभ्यासक विवेक सौताडेकर, प्रा. गणेश बेळंबे, शशिकांत पाटील सहभागी होतील.
दुपारी अडीच वाजता ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी साहित्य व वाचक’ या विषयावरील परिसंवाद होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, कथाकार डॉ. सुरेंद्र पाटील, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, डॉ. सुनिता सांगोले, कवयित्री अरुणा दिवेगावकर उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेचार वाजता उत्कृष्ट वाचकांचा सत्कार व ग्रंथोत्सवाचा समारोप अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, डॉ. जयद्रथ जाधव उपस्थित राहतील.
ग्रंथोत्सवातील ग्रंथप्रदर्शन व विक्री दोन्ही दिवस सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत सुरु राहील. जास्तीत जास्त वाचक, साहित्यप्रेमी नागरिकांनी या ग्रंथोत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., सदस्य शिक्षणाधिकारी गणेश मापारी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, प्रकाशक संघटनेचे आत्माराम कांबळे, म.सा.प.लातूर शाखाध्यक्ष डॉ. जयद्रथ जाधव, जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय अध्यक्ष हावगीराव बेरकीळे, ग्रंथमित्र पांडुरंग अडसुळे, सोपान मुंडे, ह.रा. डेंगळे, हिरालाल पाटील, सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यांनी केले आहे.
إرسال تعليق