मन करा रे प्रसन्न lसर्व सिद्धीचे कारण ll

मन करा रे प्रसन्न lसर्व सिद्धीचे कारण ll





तुकाराम महाराज म्हणतात की,मन करा रे प्रसन्न |
सर्व सिद्धीचे कारण || याप्रमाणे आनंद ही अशी मानसिक अवस्था आहे की या अवस्थेचा सरळ सरळ संबंध आपल्या आरोग्याशी जोडलेला असतो. आपण जेव्हा जास्तीत जास्त आनंदी असू त्या वेळी आपले आरोग्य उत्तम असते. आरोग्य उत्तम असेल तर आनंदी असायला कोणतेही वेगळे कारण शोधायची गरज भासत नसते. मात्र अमुक गोष्ट मिळाल्या नंतरच मला आनंद होईल,अशी मानसिकता जर आपण ठेवली तर ती गोष्ट मिळवण्याची अवास्तव ओढ आपल्या मनाला दुःखाला कारणीभूत होते. शरीराने निरोगी असून सुद्धा जर मनाचे आरोग्य बिघडले तर त्याचा आपल्या शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आयुष्यभर आपण बाह्य जगात आनंद शोधण्याचा कितीही प्रयत्न केला तरी खरा आनंद म्हणजे आपले निरोगी धडधाकट शरीर यातच सामावलेला असतो. सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा ज्याच्या पायाशी लोळण घेत असतील असा धनाढ्य व्यक्ती, जर आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेला असेल किंवा डॉक्टरांनी (वैद्यांनी)त्याला अनेक पथ्ये पाळायला सांगितली असतील, तर समोर दिसत असणाऱ्या अनेक सुखसुविधांचा तो उपभोग घेऊ शकत नाही. क्षणोक्षणी तो आपल्या नशिबाला दोष देत आणखी दुःखी होत असतो. लुळ्या-पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी वरी असे म्हणतात.याचा अर्थ गरिबी भूषणावह अजिबात नाही. आयुष्यात पैशाला खूप महत्त्व आहे. पैशाने अनेक सुखसुविधा विकत घेता येतात. परंतु पैसे मिळवण्याच्या अतिहव्यासाने अनेक जण स्वतःचे आरोग्य गमावून बसतात. निरोगी शरीर ही जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. सकाळी झोपेतून जागे होताना आज मला कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहायचे आहे, असे जर रोज स्वतःला बजावले. तर आनंदी राहायची सवय लागून जाईल. आनंदी राहण्याच्या सवयी पाठोपाठ सकारात्मक विचारसरणीला आपोआप चालना मिळत जाते. समोर कोणतीही आपत्ती किंवा दुःखदायक घटना घडली तरी निराश होऊन कोसळून न जाता, त्यावर सकारात्मक उपाय शोधले जातात. मनाविरुद्ध घडत असलेल्या गोष्टींना आव्हान म्हणून बघितले तर आयुष्यातली रंजकता आणखी वाढत जाते. मनाचे आरोग्य चांगले ठेवले तर अनेक दुष्प्रभ आजारावर मात केल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतच आहेत. लहान मूल खूप आनंदी असते. ते झोपेत सुद्धा खुदकन हसते. ते हास्य मिळवण्यासाठी त्याने कोणतीही उठाठेव केलेली नसते. किरकोळ गोष्टीवरून आपली चिडचिड होण्याऐवजी अगदी क्षुल्लक गोष्टींमुळे आपल्याला आनंदी कसे होता येईल याचा प्रयत्न सतत करायला हवा.

Post a Comment

أحدث أقدم