जिल्हा रेशीम कार्यालयाच्यावतीने शेतकऱ्यांना तुती लागवडपूर्व प्रशिक्षण
लातूर: रेशीम कार्यालयाच्यावतीने महारेशीम अभियानांतर्गत प्राप्त अर्जातून तुती लागवड करणाऱ्या पाचशे लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. रेशीम शेतकऱ्यांना नर्सरीद्वारे तुती लागवड केल्यास बाग शंभर टक्के तयार होवून चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे तुती लागवडीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी आज जिल्हा रेशीम कार्यालयाच्यावतीने रेशीम संकुल येथे तुती लागवड नर्सरीपूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहयोचे उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे होते.
कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संदीप देशमुख, कृषि विद्यापीठाचे निवृत प्रा. सरवदे, लातूरचे रेशीम विकास अधिकारी शंकर वराट यावेळी उपस्थित होते. सध्या रेशीम कोषास प्रतिक्विंटल 60 ते 65 हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या प्रशिक्षणास 350 शेतकरी उपस्थित होते.
शास्त्रज्ञ श्री. देशमुख यांनी तुती लागवडीसाठी जमिनीची निवड, माती परिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. सरवदे यांनी तुती लागवडीसाठी नर्सरी का आवश्याक आहे, याची माहिती दिली.
रेशीम विकास अधिकारी श्री. वराट यांनी नर्सरी लागवडीसाठी नर्सरीपूर्व नियोजन, तुतीच्या जाती, नर्सरी पद्धत, बेणे वाहतूक, बिजप्रकीया, नर्सरी व्यावस्थापन, तुती बेणे उपलब्ध असलेले शेतकऱ्यांची माहिती तसेच रेशीम उद्योगासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत पीपीटीद्वारे सादरीकरण केले. तसेच जिल्हा रेशीम कार्यालयाचे सी. एस .पाटील यांनी नर्सरी लागवडीविषयी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.
उपजिल्हाधिकारी श्री. वाघमारे यांनी रेशीम उद्योगातील विविध संधी, इतर पिकाच्या तुलनेत रेशीम शेतीतून आर्थिक लाभ मिळत असल्याने शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याचे आवाहन केले.
जिल्ह्यातील प्रगतशील रेशीम शेतकरी लिंगेश्वर खिचडे, रवि बिराजदार, दशरथ देशमुख, श्री. आलुरे, आकाश जाधव, श्री. पेठकर, आंबासाहेब पाटील यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहीत देशमुख, संतोष पवार, राहूल कदम, श्रीकांत डोगर, बालाजी माळी, श्री. गंगथडे, श्री. कसपटे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राहुल कदम यांनी केले, सी. एस. पाटील यांनी आभार मानले.
إرسال تعليق