शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विक्रम काळेंना विजयी करा- पाटील


 शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विक्रम काळेंना विजयी करा- पाटील

लातूरमधील शिक्षक मेळाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद  


 लातूर -सरकार कोणत्याही पक्षाचे असो. शिक्षकांचे प्रश्न रस्त्यावर उतरून सोडवणारा आमदार म्हणजे विक्रम काळे आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून विक्रम काळे यांना बहुमताने विजयी करावे, भविष्यात आमचे सरकार येताच विक्रम काळे म्हणतील ते देऊ, अशी हमी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली येथील मुक्ताई मंगल कार्यालयात शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य यांचा मेळावा झाला. यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे - पाटील, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार धीरज देशमुख, राष्ट्रवादी कॉंगे्रसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, धर्माजी सोनकवडे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, राष्ट्रवादीचे संजय शेटे, ऍड. उदय गवारे, संतोष सोमवंशी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, आमचे सरकार असताना शिक्षकांना जुन्या पेन्शनचा प्रश्‍न अंतिम टप्प्यात होता. आणखी काही काळ आमचे सरकार असते तर तो अतापर्यंत मार्गी लागला असता. विक्रम काळे हे शिक्षकांचा प्रश्‍न म्हटले की, अगदी रस्त्यावर उतरून काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत. मागील १६ वर्षांत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले आहे. शिक्षणाचा पाया ढासळू न देण्यासाठी शिक्षकांनी विक्रम काळे यांना प्रचंड मताधिक्क्यांनी विजयी करावे, असे पाटील यांनी केले.
यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, विक्रम काळे मागील सोळा वर्षांपासून संपूर्ण मराठवाड्यात कायम प्रचारात आहेत. ते प्रत्येकाच्या अडीअडचणीला धाऊन जातात. त्यांनी प्रत्येकाच्या अडचणी सोडविल्या आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्‍चित आहे. त्यांनी आमदारकीचे हे काम व्रत म्हणून स्वीकारले आहे. त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊन लातूर पॅटर्न निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, विक्रम काळे हे हरहुन्नरी लोकप्रतिनिधी आहेत. शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी रात्रंदिवस झटणारे नेतृत्व आहे, त्यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार धीरज देशमुख यांनीही आपले मत व्यक्त केले. माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी विक्रम काळे हे शिक्षकांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणारे आमदार आहेत. आता वंचित आघाडीची युतीही झाली आहे. वंचितच्या मतदारांनी विक्रम काळे यांच्याच बाजुने मतदान करावे, असे आवाहन केले.
विक्रम काळे यांनी प्रास्ताविक भाषणात वसंत काळे यांच्या पश्‍चात मला भाऊ म्हणून सर्व शिक्षकांनी स्वीकारले आहे. आपण शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबविला. शाळांना संगणक, प्रिंटर दिले. एवढेच नव्हे तर मराठवाड्यातील शाळांसाठी साडेनऊ कोटी रूपयांची ग्रंथसंपदा दिली. या उपक्रमाचे शरद पवार यांनीदेखील कौतुक केले. मी जुनी पेन्शन मंजूर करून घेण्यासाठी लढत आहे. शिक्षकांच्या प्रश्‍नासंदर्भात भविष्यातही पाठपुरावा करीतच राहीन. मतदारांनी आपले अमूल्य मत मला द्यावे, असे आवाहन करून त्यांनी लातूरच्या देशमुख घराण्याचा मला कायम आशीर्वाद आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Post a Comment

أحدث أقدم